मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL साठी गूड न्यूज, शेवटचा अडसरही झाला दूर, पाकिस्तानच्या प्रयत्नांना धक्का!

IPL साठी गूड न्यूज, शेवटचा अडसरही झाला दूर, पाकिस्तानच्या प्रयत्नांना धक्का!

Photo-IPL/Twitter

Photo-IPL/Twitter

आयसीसीने (ICC) 2024 पासून सुरू होणाऱ्या आगामी भविष्य दौरा कार्यक्रम म्हणजेच एफटीपीमध्ये (FTP) आयपीएलला (IPL) सगळ्यात मोठा दिलासा दिला आहे.

    मुंबई, 16 जुलै : आयसीसीने (ICC) 2024 पासून सुरू होणाऱ्या आगामी भविष्य दौरा कार्यक्रम म्हणजेच एफटीपीमध्ये (FTP) आयपीएलला (IPL) सगळ्यात मोठा दिलासा दिला आहे. 2024 पासून आयपीएलसाठी अडीच महिन्यांचं वेगळं प्रावधान करण्यात आलं आहे. या काळात कोणतीही आंतरराष्ट्रीय सीरिज निर्धारित करण्यात आलेली नाही, त्यामुळे सगळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध असतील. आयसीसीच्या या मसुद्यामध्ये आयपीएलसाठी दोन आठवड्यांचा अधिकचा वेळ देण्यात आला आहे. याआधी हा काळ मार्च अखेर ते मे अखेरपर्यंत होता, पण आता हीच वेळ दोन आठवड्यांनी वाढवल्यामुळे मार्च अखेर ते जूनपर्यंत झाली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या प्रस्तावाला विरोध करेल, कारण पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानला इतर बोर्डांकडून समर्थन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयपीएल परदेशी खेळाडूंना सर्वाधिक रक्कम देते. खेळाडूंना मिळणाऱ्या या रकमेच्या 10 टक्के हिस्सा त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला मिळतो, त्यामुळे बहुतेक देश आयपीएल दरम्यान कोणत्याही मॅच खेळवत नाही. आयसीसी बोर्डाच्या सदस्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांची खिल्ली उडवली आहे. 'रमीझ राजा यांना त्यांच्या देशातल्या मीडियासमोर काही बोलायचं असतं, जे उचित असतं तेच तो बोलतो आणि हीच त्याची समस्या आहे. आयसीसीच्या बैठकीत मात्र त्याचं प्रदर्शन तसं नसतं. त्याने कधीही जोरदार विरोध केला नाही. हे होणार आहे, हे त्याला माहिती आहे. बोर्ड आणि खेळाडूंनाही हेच हवं आहे,' असं आयसीसीच्या सदस्याने सांगितलं. आयपीएल 2021 पर्यंत आयपीएल स्पर्धा 8 टीममध्ये खेळवली गेली, पण 2022 पासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोन टीम वाढल्यामुळे ही संख्या 10 झाली, ज्यामुळे एकूण सामन्यांची संख्या 74 झाली. भविष्यामध्ये आयपीएल सामन्यांची संख्या 84 आणि मग 94 होणार आहे. आयपीएलला अडीच महिन्यांचा काळ देण्यात आला असला तरी इंग्लंडच्या द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगसाठी वेगळा वेळ देण्यात आलेला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड द हंड्रेड आणि बिग बॅश लीगवेळी मोठ्या स्पर्धा नसतील आणि दोन्ही देशांचे मोठे खेळाडू लीगसाठी उपलब्ध असतील, यासाठी प्रयत्न करतील. 25 आणि 26 जुलैला बर्मिंघममध्ये आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेमध्ये हा मसुदा ठेवून त्याला मंजुरी देण्यात येईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Icc, Ipl

    पुढील बातम्या