मुंबई, 29 सप्टेंबर : यंदाची दिवाळी बीसीसीआयसाठी (BCCI) बम्पर बोनस ठरणार आहे, कारण आयपीएलच्या (IPL Tender) दोन नव्या टीमसाठी आतापर्यंत 12 जणांनी टेंडर विकत घेतली आहेत. 2 हजार कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवल्यानंतरही टेंडर विकत घेण्यासाठी अनेक जण रस दाखवत असल्यामुळे बीसीसीआयनेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. 10 ऑक्टोबर टेंडर विकत घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे आणखी काही जण उत्साह दाखवतील, असं बीसीसीआयला वाटत आहे. टेंडर विकत घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर रस दाखवला गेल्यामुळे बीसीसीआयला लिलावातून 3,500 कोटी रुपये एका टीमचे मिळण्याचा अंदाज आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार आरपीएसजी ग्रुपचे संजीव गोयंका, ऑरोबिंदो फार्मा, टोरेंट फार्मास्युटिकल्स, ब्रॉडकास्ट ऍण्ड स्पोर्ट्स कन्सलटिंग एजन्सीज आयटीडब्ल्यू, ग्रुप एम, सिंगापूरची प्रायव्हेट इक्विटी फर्म आणि इतर काही कंपन्यांनी टेंडर विकत घेतली आहेत.
आश्चर्यकारक म्हणजे अदानी ग्रुपने अजूनही नव्या टीमसाठीचं टेंडर विकत घेतलेलं नाही. 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ असल्यामुळे अदानी ग्रुप उशीरा प्रक्रियेत उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 17 ऑक्टोबरला नव्या टीमसाठी लिलाव (IPL Team Auction) होणार होता, पण आता हा लिलाव 25 ऑक्टोबरला दुबईमध्ये होणार आहे.
टेंडरसाठीचे नियम
टेंडर विकत घेताना 3 पेक्षा जास्त पार्टनर एकत्र येऊ शकत नाहीत. तीन पैकी एका पार्टनरची नेट वर्थ 2,500 कोटी रुपये आणि वार्षिक उलाढाल कमीत कमी 3 हजार कोटी रुपये असावी.
टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठीची बेस प्राईज 2 हजार कोटी रुपये असेल.
तांत्रिक लिलावात क्वालिफाय होणारे मुख्य लिलावात उतरू शकतात.
एक जण दोन शहरांसाठी बोली लावू शकतो. यामध्ये अहमदाबाद, लखनऊ, इंदूर, कटक, गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक टीम प्रत्येक वर्षी 10 टक्के पुढची 10 वर्ष आणि 10 वर्षांनंतर 20 टक्के रक्कम देईल. या बदल्यात बीसीसीआय आयपीएलच्या प्रत्येक मोसमाचा 50 टक्के महसूल देईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.