मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL2022: उमरानची स्वप्नपुर्ती! रिटेन झाल्यावर ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया

IPL2022: उमरानची स्वप्नपुर्ती! रिटेन झाल्यावर ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया

Umran Malik

Umran Malik

सनरायझर्स हैदराबादने(SRH) पुढच्या सिझनसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही (Umran Malik)समावेश आहे.

नवी दिल्ली, 3 डिसेंबर: आयपीएल(IPL2022) रिटेनचा सोहळा पार पडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटू लागल्या आहेत. आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी प्रत्येक फ्रेंचायझीला प्रत्येकी चार खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार (रिटेन) होते. सनरायझर्स हैदराबादने(SRH) पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही (Umran Malik)समावेश आहे. संघाने रिटेन केल्यामुळे उमरान भलताच खुश झाला आहे.

आयपीएलच्या 14 व्या सिझनच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात वेगवान चेंडू फेकून उमरान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. तो सध्या भारतीय अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्याचे वडील अब्दुल रशीद मलिक यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, सनरायझर्स हैदराबादने रिटेन केल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात व्यस्त आहे त्यामुळे त्याच्याशी गुरुवारीच फोनवर संवाद साधता आला.

यावेळी त्यांनी सांगितले की, उमरान त्याला सनरायझर्स हैदराबादने रिटेन केल्यामुळे आनंदी आहे. उमरान त्याच्या वडिलांसोबत बोलताना म्हटला की, ज्या संघाने त्याला आयपीएलसारख्या मोठ्या स्टेजवर संधी दिली, त्या संघासोबतच तो पुढे खेळू इच्छित होता. त्याची इच्छा होती की, लिलावात देखील त्याला सनरायझर्स हैदराबाद संघानेच विकत घ्यावे.

त्याव्यतिरिक्त जम्मू कश्मीरचाच दुसरा खेळाडू अब्दुल समदला देखील पुढच्या हंगामासाठी हैदराबाद संघाने रिटेन केले आहे. याबाबत बोलताना उमरान म्हटला की, समद सोबत खेळल्यामुळे त्याला खूप काही शिकायला मिळेल. हे दोघेही एकत्र सराव करतात आणि त्यांचे एकमेकासोबत चांगले संबंध देखील आहेत. केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेला तिसरा खेळाडू आहे.

उमरानला मिळणार 4 कोटी

उमरान हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना कायम ठेवल्याचा खूप फायदा झाला. यापूर्वी उमराणला 10 लाख रुपये मिळत होते. आता कायम ठेवल्यानंतर त्याला 4 कोटी मिळतील, कारण आयपीएलच्या रिटेन पॉलिसीनुसार रिटेन केलेल्या खेळाडूला किमान 4 कोटी मिळतील आणि उमरानला 4 कोटींमध्ये राखून ठेवण्यात आले आहे, जे 39 पट जास्त आहे.

बालपणी जे सांगितले ते उमरान पूर्ण करत आहे

अब्दुल रशीद सांगतात की, उमरान लहान असताना तो रस्त्यावर इतर मुलांसोबत क्रिकेट खेळायचा. जेव्हा मी त्याला काही सांगायचो तेव्हा तो फक्त एवढंच म्हणायचा की पापा, मला क्रिकेटमध्ये तुमचा अभिमान वाटेल. मी देशासाठी खेळेन. आज माझ्या मुलाने माझ्या नावाचा गौरव केला आहे. आज प्रत्येकाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

उमरान मलिकेच्या वडिलांचे जम्मूमधील शाहीदी चौकात फळविक्रिचे दुकान आहे. हे दुकान त्याचे वडील आणि चुलते सांभाळतात.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, SRH