मुंबई, 6 जानेवारी : आयपीएल (IPL 2021) च्या यंदाच्या मोसमाआधी आणखी एक मुंबईकर दिल्ली (Delhi Capitals) च्या गळाला लागला आहे. दिल्लीच्या टीममध्ये श्रेयस अय्यर हा मुंबईकर कर्णधार आहे, तर पृथ्वी शॉ, तुषार देशपांडे, अजिंक्य रहाणे हे मुंबईकर खेळाडूदेखील दिल्लीच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यातच आता अजिंक्य रहाणेचे माजी प्रशिक्षक आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू प्रविण आमरे (Pravin Amre) यांनाही दिल्लीच्या टीमची मोठी जबाबदारी मिळाली आहे. आयपीएलच्या पुढच्या दोन मोसमांसाठी प्रविण आमरे दिल्लीच्या टीमचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. 52 वर्षांचे प्रविण आमरे 2014 पासून 2019 पर्यंत दिल्लीच्या टीमसोबत होते. या कालावधीत आमरे यांनी दिल्लीच्या टीमसाठी टॅलेंट हेड स्काऊट ही जबाबदारी पार पाडली.
UPDATE Pravin Amre rejoins Delhi Capitals for the next 2 seasons Having previously worked as our Head Talent Scout between 2014-2019, Amre will join our existing coaching staff, as an Assistant Coach Read more: https://t.co/nXSVgeHwak#YehHaiNayiDilli pic.twitter.com/4T1yt8EzPU
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 6, 2021
'दिल्लीच्या टीमशी जोडला गेल्यामुळे टीम प्रशासनाचा आभारी आहे. 2020 साली दिल्लीची टीम पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली. या टीमशी पुन्हा एकदा जोडल्यामुळे उत्साही आहे. पुन्हा एकदा रिकी पॉण्टिंग आणि श्रेयस अय्यरसोबत काम करण्याची संधी मिळेल,' असं प्रविण आमरे म्हणाले.
प्रविण आमरे यांनी भारतासाठी 11 टेस्ट आणि 37 वनडे मॅच खेळल्या. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून आमरे यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. प्रशिक्षक असताना आमरे यांनी मुंबईला तीनवेळा रणजी ट्रॉफी जिंकवली. रहाणेसोबत आमरे यांनी अनेक भारतीय खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणही दिलं.
'प्रविण आमरे पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमसोबत आले, त्यामुळे त्यांचे आभार. काही प्रशिक्षक भारताच्या स्थानिक क्रिकेटला पूर्णपणे जाणतात, आमरे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्यामुळेच श्रेयस, ऋषभ आणि पृथ्वी यांच्यासारखे खेळाडू आमच्या टीममध्ये आले. त्यांचा अनुभव पुन्हा एकदा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. प्रविण आमरे दिल्लीच्या टीममध्ये आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत,' अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या टीमचे सीईओ धीरज मल्होत्रा यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.