मुंबई, 2 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी प्रत्येक टीमने त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी (IPL Retention 2022) मंगळवारी जाहीर केली. आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं आहे. यातली काही नावं अपेक्षित होती, तर रिटेन केलेल्या काही खेळाडूंमुळे अनेकांना धक्का बसला. आयपीएल 2021 ची चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), एमएस धोनी (MS Dhoni), मोईन अली (Moeen Ali) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना रिटेन केलं.
चेन्नईची टीम जडेजाला 16 कोटी, धोनीला 12 कोटी, मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटी रुपये देणार आहे. चेन्नईने या खेळाडूंवर 42 कोटी रुपये खर्च केल्यामुळे चेन्नईकडे आता लिलावात खर्च करण्यासाठी 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.
खरं तर चेन्नईकडे धोनीला पहिल्या पसंतीचा खेळाडू ठेवण्याची संधी होती, पण तरीही त्याने स्वत:ला पहिल्या पसंतीचा खेळाडू ठेवलं नाही. आयपीएल रिटेनशनच्या नियमानुसार टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या खात्यातून पहिल्या खेळाडूचे 16 कोटी, दुसऱ्या खेळाडूचे 12 कोटी, तिसऱ्या खेळाडूचे 8 कोटी आणि चौथ्या खेळाडूचे 6 कोटी जाणार होते.
खरंतर अनेकांना धोनी स्वत:ला चौथ्या पसंतीचा खेळाडू ठेवून फक्त 6 कोटी रुपये घेईल, असं वाटत होतं, पण त्याने 12 कोटी रुपये का घेतले, याबाबतचं कारण ज्येष्ठ क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितलं आहे. 'धोनीने सहज स्वत:ला चौथा खेळाडू ठेवून 6 कोटी रुपये घेतले असते, पण तो आणखी एक मोसम खेळेल. धोनी जेव्हा निवृत्त होईल, तेव्हा चेन्नईकडे त्याचे 12 कोटी रुपये असतील. या 12 कोटी रुपयांमध्ये ते चांगला खेळाडू विकत घेऊ शकतात, पण धोनीने स्वत:ला 6 कोटी रुपयांवर ठेवलं असतं, तर त्यांना या 6 कोटी रुपयांमध्ये चांगला खेळाडू मिळाला नसता,' असं हर्षा भोगले म्हणाले.
आयपीएलमध्ये 8 टीमनी त्यांचे खेळाडू रिटेन केल्यानंतर आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद या प्रत्येकी 3-3 खेळाडूंना विकत घेणार आहेत. यानंतर आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएलचा हा लिलाव शेवटचा असण्याची शक्यता आहे, कारण काही टीमनी सारखा खेळाडूंचा लिलाव करण्यावर आक्षेप घेतले आहेत. फ्रॅन्चायजी टीम तयार करते, युवा खेळाडूंवर गुंतवणूक करते. हे खेळाडू जेव्हा मोठे होतात आणि टीमला गुंतवणुकीचा परतावा द्यायला सुरुवात करतात तेव्हा पुन्हा लिलाव होतो, त्यामुळे आता पुन्हा लिलाव होऊ नये, अशी भूमिका काही फ्रॅन्चायजींनी मांडली आहे. आयपीएलमध्ये आता रिटेन केलेल्या खेळाडूंसोबत आणि लिलावात विकत घेतलेल्या खेळाडूंसोबत प्रत्येक टीम तीन वर्षांचा करार करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction