मुंबई, 24 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)ने आयपीएल (IPL) च्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीममध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. स्मिथने दिल्ली कॅपिटल्ससाठी एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer)ने स्मिथला ट्रोल केलं आहे. आयपीएल 2021 साठीच्या लिलावात (IPL Auction 2021) दिल्ली कॅपिटल्सने स्मिथला 2.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. लिलावाआधी राजस्थान रॉयल्सने स्मिथला रिलीज केलं होतं.
आयपीएलच्या या मोसमात दिल्लीला पहिली ट्रॉफी मिळवून द्यायचा प्रयत्न करू, असं स्मिथ या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
'दिल्ली टीमशी जोडला गेल्यामुळे मी उत्साहित आहे. टीममध्ये खूप चांगले खेळाडू आणि शानदार प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग आहे. या टीमसोबत काही सुखद आठवणी जोडण्याची माझी इच्छा आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत चांगले निकाल मिळवण्यासाठी मी टीमची मदत करेन,' असं स्मिथ म्हणाला आहे.

स्मिथच्या या व्हिडिओवर वसीम जाफरने शोएब अख्तरचा फोटो असलेलं एक मीम शेयर करत ट्रोल केलं आहे.
2019 साली स्मिथ राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये आला होता, तर 2020 साली युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये तो राजस्थानचा कर्णधार होता, पण राजस्थानची टीम स्मिथच्या नेतृत्वात शेवटच्या क्रमांकावर राहिली. आयपीएलमध्ये स्मिथने 95 मॅचमध्ये 35.34 च्या सरासरीने 2,333 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.