मुंबई, 26 मार्च : आयपीएलच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलला अवघे 5 दिवस शिल्लक असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला मोठा धक्का बसलाय. आरसीबीचा स्टार फलंदाज रजत पाटीदार दुखापतीमुळे आयपीएलच्या पहिल्या सत्राला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलच्या तोंडावर आरसीबी संघाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणारा रजत पाटीदार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगळुरू येथे पुनर्वसन करत आहे. पाटीदार हा आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी महत्त्वाचा फलंदाज होता. त्याने एलिमिनेटर सामन्यात आपल्या शतकासह संघाला विजय मिळवून दिला. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, रजत पाटीदारच्या पायाच्या टाचेला दुखापत झाली असून या दुखापतीमुळे तीन आठवडे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर एमआरआय स्कॅननंतर तो उर्वरित आयपीएलमध्ये आपल्या संघाकडून खेळू शकेल की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार रजत पाटीदार आरसीबी कॅम्पमध्ये सामील होण्यापूर्वीच जखमी झाला होता. आता आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची परवानगी घ्यावी लागेल. रजत पाटीदार हा आरसीबी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार होता, परंतु आता त्याच्या दुखापतीमुळे आरसीबीच्या फलंदाजीच्या लाइनअपमध्ये बदल होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, RCB