मुंबई, 15 एप्रिल: सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनंतर राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला. केकेआर संघाने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचे 7 गडी राखून 17.3 षटकांत हंगामातील सलग तिसरा विजय खिशात घातला. सनरायजर्स हैदराबादने सात विकेटनं कोलकात्याचा पराभव केला. राहुल त्रिपाठी- मार्करमची तुफानी खेळीचा हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा ठरला. मार्करम याने आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मार्करमने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
हैदराबादच्या राहुल त्रिपाठीनं कोलकात्याच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. राहुल त्रिपाठीने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. राहुल त्रिपाठीने चार चौकार आणि चार षटकारासह अर्धशतक झळकावलं. मात्र, आंद्रे रसेलनं धोकादायक राहुल त्रिपाठीला बाद करत कोलकात्याला तिसरं यश मिळवून दिले. राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावांची खेळी केली. राहुलने बाद होण्यापूर्वी एडन मार्करमसोबत 94 धावांची भागीदारी केली.
कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) सुरुवात खराब झाली आहे. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि केन विल्यमसन (Kane Williamson), हे दोन्ही सलामीवीर गमावले आहेत. हैदराबादला पहिला धक्का अभिषेकच्या रूपाने बसला जो 10 चेंडूत केवळ 3 धावा करून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन 16 चेंडूत 17 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. रसेलने विल्यमसनचा त्रिफळा उडवला आणि संघाच्या झोळीत दुसरे यश पाडले.
हे ही वाचा-'शेजारी फिनिशर मागायला विसरलात', विजयानंतर गुजरात टाइटन्सने RRला केले ट्रोल
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. दुसऱ्याच षटकात फिंचला बाद करत हैदराबादला पहिलं यश मिळालं.
त्यानंतर कोलकात्याची फलंदाजी ढासळली. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. फिंच (7), वेंकटेश अय्यर (6), सुनेल नारायण (6), शेल्डन जॅक्सन (7) आणि पॅट कमिन्स (3) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार श्रेयस अय्यर याने 28 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण उमरान मलिकच्या भेदक यॉर्करवर अय्यर बाद झाला.
हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. कोलकात्याच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. ठरावीक अंतराने कोलकात्याच्या विकेट घेतल्या. हैदराबादकडून नटराजन याने सर्वाधिक भेदक मारा केला. नटराजन याने चार षटकार तीन विकेट घेतल्या. तर युवा उमरान मलिक याने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन आणि जगदिश सुचित यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, KKR, Kolkata, Sunrisers hyderabad