मुंबई, 22 मे : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल 2022 चा (IPL 2022) मोसम निराशाजनक राहिला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला यावर्षी 14 पैकी फक्त 4 मॅच खेळता आल्या. 8 पॉईंट्ससह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये 10व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर राहिली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवत मुंबईने मोसमाचा शेवट गोड केला. मुंबईने या सिझनच्या 14 सामन्यांमध्ये 22 खेळाडूंना संधी दिली, पण डावखुरा फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकर याला बेंचवरच बसवलं.
सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईने 2021 साली लिलावात विकत घेतलं, तेव्हापासून त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईने 2022 च्या लिलावात अर्जुनला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पहिल्या 8 मॅच गमावल्यानंतरच मुंबई प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली होती. रोहितने तेव्हा युवा खेळाडूंना संधी मिळेल, असं सांगितलं होतं. रोहितने सांगितल्याप्रमाणे मुंबईने युवा खेळाडूंना मैदानात उतरवलंदेखील, पण अर्जुनला मात्र मैदानाबाहेर राहावं लागलं.
दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या खेळाडूंना मदत करताना दिसला. खेळाडूंना पाणी देण्यासोबतच त्याने कोचचे मेसेजही मैदानात पाठवले. अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) मुंबईच्या या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होती. अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या खेळाडूंना मदत करत असल्याचा व्हिडिओ साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. बॉलीवूड चित्रपट गली बॉयचं प्रसिद्ध गाणं अपना टाइम आएगा सोबत तिने हा व्हिडिओ शेअर केला.

दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात टीम डेव्हिड मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डेव्हिडने 11 बॉलमध्ये 34 रनची आक्रमक खेळी केली. याशिवाय डेवाल्ड ब्रेविस आणि इशान किशन यांच्यात 51 रनची पार्टनरशीप झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.