मुंबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल 2022 (IPL 2022 Auction) च्या मोसमात दोन नव्या टीम जोडल्या जाणार आहेत, त्यामुळे जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग आता 10 टीमची होणार आहे. या दोन नव्या टीमना खास सवलत देण्याचा विचार बीसीसीआय (BCCI) करत आहे, क्रिकबझने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दोन नव्या टीमना लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंपैकी दोन किंवा तीन खेळाडू थेट निवडता येणार आहेत. सध्याच्या 8 टीम किती खेळाडू रिटेन (Players Retention) करतात, यावर नव्या टीमना किती खेळाडूंची सवलत द्यायची, हे ठरवण्यात येणार आहे.
प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करता येतील, या परिस्थितीमध्ये राईट टू मॅच कार्डचा (Right To Match Card) वापर करता येणार नाही, असं सांगितलं जात आहे, याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसला, तरी लवकरच फ्रॅन्चायजींना याची सगळी माहिती दिली जाणार आहे.
काय आहे राईट टू मॅच कार्ड?
याआधी झालेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये टीमना राईट टू मॅच कार्ड वापरता येत होतं, म्हणजेच ज्या खेळाडूंना रिटेन करता आलं नाही, त्यांना लिलावामध्ये राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा एकदा आपल्या टीममध्ये विकत घेता आलं.
आयपीएलच्या दोन नव्या टीमसाठी बीसीसीआयने टेंडर विकत घेण्याचा कालावधी 10 दिवसांनी वाढवला. आता टीम विकत घेण्यासाठी इच्छुक असलेले 20 ऑक्टोबरपर्यंत टेंडर विकत घेऊ शकतात. नेट वर्थमधल्या गोंधळामुळे हा कालावधी वाढवल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या टेंडर विकत घेण्यासाठी व्यक्तीची नेट वर्थ 2,500 कोटी रुपये तर कंपनीचं नेट वर्थ 3000 कोटी रुपये असणं गरजेचं आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोटक ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा, आरपी संजीव गोयंका ग्रुप, बिर्ला ग्रुप आणि अडानी ग्रुपने टेंडर विकत घेतली आहे. नव्या टीमची बेस प्राईज 2 हजार कोटी रुपये आहे, पण बीसीसीआयला यातून 7 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या शहरांसाठी नव्या टीम सर्वाधिक इच्छुक असल्याचंही सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022