मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL मध्ये अचानक मिळालेल्या संधीमुळे खेळाडूने होणाऱ्या जोडीदाराविषयी घेतला मोठा निर्णय

IPL मध्ये अचानक मिळालेल्या संधीमुळे खेळाडूने होणाऱ्या जोडीदाराविषयी घेतला मोठा निर्णय

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आरसीबीच्या चाहत्यांचा हिरो बनून रजत पाटीदार (Rajat Patidar) मैदानात उतरला आणि त्याने मोर्चा सांभाळला. रजतच्या शानदार खेळीमुळे आरसीबीने लखनौला हरवलं आणि ते क्वालिफायर 2 मध्ये पोहोचले.

    मुंबई, 28 मे : आयपीएल 2022मध्ये आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) हरवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवला होता. या सामन्यात आरसीबीचे बॅट्समन मैदानात जास्त वेळ टिकले नाहीत. फाफ डू प्लेसिसनंतर विराट कोहलीही (Virat Kohli) कमी धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर आरसीबीची टीम सामना जिंकेल, असं वाटत नव्हतं. परंतु, अशातच आरसीबीच्या चाहत्यांचा हिरो बनून रजत पाटीदार (Rajat Patidar) मैदानात उतरला आणि त्याने मोर्चा सांभाळला. रजतच्या शानदार खेळीमुळे आरसीबीने लखनौला हरवलं आणि ते क्वालिफायर 2 मध्ये पोहोचले.

    रजत पाटीदारच्या त्या दिवशीच्या शानदार खेळीने केवळ चाहत्यांचीच नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटर्सची मनं जिंकली. मध्य प्रदेशातल्या इंदूरचा रजत पाटीदार त्या मॅचनंतर हिरो ठरला आणि सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. विराटनेही रजतच्या खेळीचं कौतुक करून दबावाखाली रजत खूप चांगला खेळल्याचं म्हटलं होतं. 28 वर्षीय रजतच्या या यशाचा पाया म्हणजे लहानपणापासूनच खेळाप्रती असलेलं त्याचं समर्पण आणि शिस्त आहे, असं रजतचे कुटुंबीय सांगतात. रजतबद्दल अधिक माहिती देणारं वृत्त 'दैनिक भास्कर'ने दिलं आहे.

    लग्न पुढे ढकललं

    आयपीएल 2021मध्ये 4 मॅचेसमध्ये 71 रन्स करणाऱ्या रजतला आरसीबीने रिटेन केलं नाही. तसंच फेब्रुवारीमध्ये आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात रजतवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. त्यामुळे रजतने 9 मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता; पण लवनीथ सिसोदिया जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला 3 एप्रिलला RCB ने 20 लाख रुपयांना खरेदी केलं आणि रजतने लग्न पुढे ढकललं.

    रजतचे वडील मनोहर पाटीदार म्हणाले, 'आम्ही त्याच्यासाठी रतलामची मुलगी निवडली आहे. दोघांच्या लग्नाचा एक छोटासा कार्यक्रम होणार होता आणि त्यासाठी मी इंदूरमध्ये हॉटेलही बुक केलं होतं; पण रजतने IPLसाठी लग्न पुढे ढकललं आहे. रजत आता IPL आणि रणजी स्पर्धा संपल्यानंतर जुलैमध्ये लग्न करणार आहे.’

    IPL 2022 : Virat Kohli साठी काळ ठरतोय हा बॉलर, जुन्या जखमेवर पुन्हा केला वार!

    क्रिकेटमुळे फक्त बारावीपर्यंत शिक्षण

    रजतच्या वडिलांनी सांगितलं, 'क्रिकेटच्या व्यग्रतेमुळे रजत फक्त बारावीपर्यंतच शिकू शकला. मी रजतला स्थानिक महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला; पण इतर शहरातल्या रणजी ट्रॉफीसह (Ranaji Trophy) इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने तो परीक्षा देऊ शकला नाही. त्याची क्रिकेटमधली चांगली कामगिरी पाहून मीही त्याच्या कॉलेजच्या अभ्यासावर जास्त भर दिला नाही. त्याला क्रिकेट ही देवाने दिलेली देणगी आहे आणि तो त्याच्या पद्धतीने खेळाचा आनंद घेतो,’ असं ते म्हणाले.

    बॉलर म्हणून करिअरची सुरुवात

    रजतने आपल्या करिअरची सुरुवात बॉलर म्हणून केली होती. परंतु, कोचच्या सांगण्यावरून त्याने बॅटिंग सुरू केली. अंडर-15 टीममध्ये तो बॅट्समन बनला होता. रजत उत्तम बॅटिंग करतो. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulakar) हा त्याचा आवडता खेळाडू आहे. महत्त्वाचं म्हणजे लखनौविरुद्धच्या त्याच्या खेळीनंतर खुद्द सचिननेही रजतच्या खेळीचं कौतुक केलं होतं.

    'आम्ही रजतला दवाबापासून मुक्त ठेवतो'

    रजतचे वडील मनोहर सांगतात, की ‘आम्ही खूप साधं जीवन जगतो आणि रजतला नेहमीच चांगली कामगिरी करण्याच्या दबावापासून मुक्त ठेवतो. जरी तो एखाद्या सामन्यात लवकर बाद झाला, तरी मी त्याला सांगतो की काळजी करण्यासारखं काही नाही. कारण त्याला लवकरच पुढील संधी मिळेल.’

    IPL 2022 : KGF ने बुडवलं RCB चं जहाज, या तिघांनी फिरवलं स्वप्नावर पाणी!

    लहानपणापासून क्रिकेटची क्रेझ

    रजतचे वडील म्हणाले, 'कुटुंबाचा क्रिकेटशी संबंध रजतमुळेच आला. रजतला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं आणि त्याचं क्रिकेटवरचं प्रेम पाहून आम्ही त्याला सतत प्रोत्साहन दिलं. रजतने वयाच्या 8 व्या वर्षी इंदूरमधल्या एका क्रिकेट क्लबमध्ये (Cricket Club) प्रवेश घेतला आणि 10 वर्षांचा होताच त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलांविरुद्ध मॅचेस खेळायला सुरुवात केली. शाळेची वेळ सोडली तर घर ते क्लब आणि क्लब ते घर, एवढंच त्याचं रूटीन असायचं. रजत लहानपणापासूनच शिस्तप्रिय आहे आणि त्याचे मित्रही खूप कमी होते,’ असं त्याचे वडील सांगतात.

    रजतच्या वडिलांचा मोटारपंपचा व्यवसाय

    रजतचे वडील मनोहर हे इंदूरच्या महाराणी रोड मार्केटमध्ये मोटारपंपचा व्यवसाय करतात. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रजत 50 रन्स तरी करील अशी आम्हाला अपेक्षा होती; पण त्याने नाबाद शतकी खेळी केली आणि आम्हाला खूप आनंद झाला, असं रजतचे वडील म्हणाले.

    रजतचं क्रिकेटमध्ये पदार्पण आणि कामगिरी

    रजतने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2018 मध्ये रजत विभागीय T20 लीगमध्ये मध्य प्रदेशसाठी पहिली मॅच खेळला. 2018-19च्या सिझनमध्ये रजत मध्य प्रदेशसाठी रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 8 मॅचेसमध्ये 714 रन्स केल्या होत्या. नंतर ऑगस्ट 2019 मध्ये दिलीप ट्रॉफीसाठी त्याला इंडिया ब्लू टीममध्ये घेण्यात आलं. त्यानंतर रजतने चांगली कामगिरी करून त्याचं स्थान टिकवून ठेवलं.

    First published:

    Tags: Ipl 2022, RCB