मुंबई, 27 नोव्हेंबर : आयपीएल 2022 आधी खेळाडूंना रिटेन (IPL 2022 Players Retention) करण्यासाठी प्रत्येक टीमकडे आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक टीमला त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यायची आहे, यानंतर आयपीएलच्या दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडूंना त्यांच्या टीममध्ये घेतील, मग खेळाडूंचा लिलाव केला जाईल. एकीकडे प्रत्येक टीम महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत डिल करत आहे, पण पंजाब किंग्सला (Punjab Kings) मात्र मोठा धक्का लागला आहे. केएल राहुलने (KL Rahul) घेतलेल्या एका निर्णयामुळे पंजाब किंग्सला चार काय एक खेळाडूही रिटेन करणं मुश्कील होणार आहे.
आयपीएल रिटेनशनच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, यात 2 भारतीय आणि 2 परदेशी किंवा 3 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो.
पंजाब किंग्सच्या टीमला कर्णधार केएल राहुल, मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांना रिटेन करायचं होतं, पण केएल राहुलने टीममध्ये राहण्यास नकार दिल्यामुळे पंजाबचा खेळ बिघडला आहे.
इनसाईड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार केएल राहुल हटल्यानंतर जर पंजाबला मयंक आणि इतर खेळाडूंना रिटेन करायचं असेल, तर नियमानुसार त्यांना पहिल्या रिटेन खेळाडूला 16 कोटी रुपये द्यावे लागतील. मयंक अग्रवालला पंजाबने लिलावात 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. फ्रॅन्चायजीसाठी हा सौदा मोठ्या नुकसानीचा ठरू शकतो. याच कारणामुळे पंजाबची टीम कोणत्याच खेळाडूला रिटेन करणार नाही, असं त्यांच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. असं झालं तर पंजाबला नव्याने टीम बांधावी लागेल.
राहुल लखनऊचा कर्णधार?
केएल राहुल लखनऊच्या टीमचं नेतृत्व करणार असल्याचं बोललं जातंय. राहुल आणि लखनऊच्या टीममध्ये 3 वर्षांचा करार झाल्याचीही माहिती आहे. लखनऊच्या टीमला आरपीजीएस ग्रुपने तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लखनऊ टीमचे अधिकारी आणि राहुल यांच्यात अनेक भेटी झाल्या, यादरम्यान राहुल कॅप्टन्सीसाठीही तयार झाल्याचं सांगितलं जात आहे.
राहुलची बेस्ट कामगिरी
मागच्या 4 मोसमांपासून केएल राहुल आयपीएलचा टॉप स्कोरर आहे, ज्यामुळे त्याने ऑरेंज कॅप जिंकली
राहुलने मागच्या 4 मोसमांमध्ये प्रत्येक वर्षी 550 पेक्षा जास्त रन केल्या.
केएल राहुल ओपनिंगला बॅटिंगच नाही तर विकेट कीपिंगही करतो.
कोणत्या टीम कोणते खेळाडू रिटेन करणार?
चेन्नई सुपर किंग्स : एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली/फाफ डुप्लेसिस
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, ईशान किशन
कोलकाता नाईट रायडर्स : सुनिल नारायण, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी किंमतीसह)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Kl rahul, Punjab kings