मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022 Final) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात आज फायनल होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री 8 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. आयपीएलला आज गुजरातच्या रुपात नवा चॅम्पियन मिळेल, किंवा राजस्थान 14 वर्षांनी दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. दोन्ही टीमनी या मोसमात धमाकेदार कामगिरी केली आहे. लीग स्टेजच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर होते.
पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनी त्यांच्या कामगिरीने अनेकांना धक्का दिला, तर राजस्थानची टीम मागच्या मोसमात अपयशी ठरली होती. पण लिलावामध्ये त्यांनी उत्कृष्ट खेळाडू विकत घेतले आणि नवी टीम बांधली, ज्याचा फायदा त्यांना झाला. राजस्थानला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्यात गुजरातचा एकच बॉलर अडचणीचा ठरू शकतो. गुजरातसाठी या मोसमात हा बॉलर खऱ्या अर्थाने मॅच विनर ठरला. पॉवर प्लेमध्ये त्याने विरोधी टीमना खूप त्रास दिला, त्याचं नाव आहे मोहम्मद शमी.
मोहम्मद शमी गुजरातच्या विजयाची गॅरंटी
शमीने (Mohammad Shami) या आयपीएलच्या पॉवर प्लेमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत, या मोसमातल्या पॉवर प्ले मधल्या या सर्वाधिक विकेट आहेत. शमीने आयपीएलच्या ज्या 12 मॅचमध्ये विकेट घेतल्या, यातल्या 11 मॅचमध्ये राजस्थानचा विजय झाला आहे, म्हणजेच शमीने टीमला 90 टक्के मॅच जिंकवल्या आहेत. गुजरातने ज्या तीन मॅच गमावल्या यात मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाली नाही. ही आकडेवारी बघता मोहम्मद शमी गुजरातसाठी विजयाची गॅरंटी ठरत आहे.
गुजरातसाठी सर्वाधिक विकेट
मोहम्मद शमी गुजरात टायटन्सचा या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. 15 मॅचमध्ये त्याने 24 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत. तो या मोसमात प्रत्येक 18व्या बॉलवर विकेट घेतो. 25 रन देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फायनलमध्ये मोहम्मद शमी पुन्हा एकदा चांगला खेळला, तर राजस्थानवर तो एकटा भारी पडू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals