अहमदाबाद, 29 मे : आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात अखेरचा महामुकाबला रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातची ही पहिलीच आयपीएल आहे, तर राजस्थान रॉयल्सने पहिली म्हणजेच 2008 सालची आयपीएल जिंकली होती. आयपीएल 2022 मध्ये गुजरात आणि राजस्थान या दोन्ही टीमची कामगिरी उल्लेखनीय राहिली. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर होती.
आयपीएल इतिहासामध्ये 2011 पासून आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्सनाच (Mumbai Indians) पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहून आयपीएल ट्रॉफी जिंकता आली आहे. मुंबई ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफींवर आपलं नाव कोरलं, यातल्या 3 वेळा मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. इतर कोणत्याही टीमना लीग स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहून ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे गुजरातला मुंबईच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
आयपीएल 2017
आयपीएल 2017 च्या लीग स्टेजला मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. रोहितच्या टीमने 14 पैकी 10 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. मुंबईने 2017 ची फायनल पुण्याविरुद्ध खेळली. पुण्याने त्या मोसमात 9 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. योगायोग म्हणजे या मोसमातही पॉईंट्स टेबलची परिस्थिती अशीच आहे. गुजरातनेही 14 पैकी 10 मॅच जिंकल्या आणि 4 मध्ये त्यांचा पराभव झाला, तर राजस्थाननेही 9 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं.
आयपीएल 2019
आयपीएल 2019 मध्येही मुंबई लीग स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. त्यावेळी मुंबईने 9 मॅच जिंकल्या होत्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यावर्षी फायनलमध्ये मुंबईचा सामना सीएसकेविरुद्ध झाला. लीग स्टेजमध्ये सीएसकेने देखील मुंबई इतक्याच मॅच जिंकली होत्या, पण नेट रनरेटच्या फरकामुळे मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली.
आयपीएल 2020
आयपीएल 2020 मध्येही मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली. 9 विजय आणि 5 पराभवांसह त्यांच्या खात्यात 18 पॉईंट्स होते. 2020 च्या फायनलमध्ये मुंबईचा मुकाबला दिल्लीविरुद्ध झाला. त्यावेळी लीग स्टेजनंतर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर होती, त्यांनी 8 मॅच जिंकल्या तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
आयपीएलमध्ये 2011 सालापासून प्ले-ऑफच्या पद्धतीने मॅच खेळवल्या जाऊ लागल्या. या 11 मोसमांमध्ये मुंबई वगळता टेबल टॉपर टीमला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Mumbai Indians, Rajasthan Royals