अहमदाबाद, 29 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Final) फायनलमध्ये गुजरात टायटन्सच्या बॉलिंगसमोर राजस्थान रॉयल्सला (Gujarat Titans vs Rajasthan Royals) मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रन केले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देत 3 विकेट घेतल्या.
हार्दिक पांड्याला मिळालेल्या तिन्ही विकेट या राजस्थान रॉयल्सचे मुख्य खेळाडू होते. हार्दिक पांड्याने सगळ्यात पहिले राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) 14 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर हार्दिकला या आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी खेळाडू असलेल्या जॉस बटलरची विकेट मिळाली. या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन केलेला बटलर (Jos Buttler) 39 रनवर खेळत होता, पण तो आणखी धोकादायक ठरण्याच्या आधीच हार्दिकने त्याचा काटा काढला.
संजू सॅमसन आणि बटलरची विकेट घेतल्यानंतर हार्दिकने शिमरन हेटमायरला आपल्याच बॉलिंगवर 11 रनवर कॅच आऊट केलं. राजस्थानने या मोसमात संजू सॅमसनला 14 कोटी रुपयांना आणि बटलरला 10 कोटींना रिटेन केलं, त्याशिवाय शेमरन हेटमायरला (Shimron Hetmyer) त्यांनी 8.5 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतलं. राजस्थानची ही 32.5 कोटींची गुंतवणुकीचा हार्दिकने चुराडा केला.
जॉस बटलरच्या 39 आणि यशस्वी जयस्वालच्या 22 रनशिवाय राजस्थानच्या कोणत्याही खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही. गुजरातकडून हार्दिकला 3 आणि साई किशोरला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद शमी, यश दयाळ आणि राशिद खान यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Rajasthan Royals