मुंबई, 21 मे : आयपीएल 2021 मध्ये चॅम्पियन झालेल्या सीएसकेची (CSK) कामगिरी यावर्षी (IPL 2022) निराशाजनक झाली. चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) या मोसमात प्ले-ऑफमध्येही प्रवेश करता आला नाही. आयपीएल इतिहासात फक्त दुसऱ्यांदा चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफ गाठता आलेली नाही. टीमचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी सीएसकेच्या या खराब कामगिरीचं कारण सांगितलं आहे. चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी सीएसके यंदा पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर राहिली, त्यांनी 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकल्या.
शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या मोसमातल्या अखेरच्या मॅचमध्येही सीएसकेचा 5 विकेटने पराभव झाला. 'आमच्या बऱ्याच मॅच जिंकण्या जवळच्या होत्या, पण यात आमचा विजय झाला नाही. टीम मागच्या मोसमासारखी खेळू शकली नाही, तसंच यंदा काही नवीन खेळाडूही होते. जेव्हा तुम्ही नव्या सत्राची सुरूवात करता तेव्हा तुमच्याकडे अनेक नवीन खेळाडू असतात, या गोष्टी तुमची परीक्षा बघतात,' असं फ्लेमिंग म्हणाले.
'मागच्या चार वर्षांमधली कामगिरी आम्हाला करता आली नाही, कारण हे मोठं आव्हान होतं. फॉर्ममध्ये असलेले काही खेळाडू आमच्याकडे नव्हते, ज्यामुळे आम्हाला विजय मिळवता आला नाही. आमच्याकडे चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. यावेळी झालेी कामगिरी पुढच्या वर्षी चांगलं करण्याची प्रेरणा देईल,' अशी प्रतिक्रिया फ्लेमिंगनी दिली.
सीएसकेचे काही खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते तर काहींना दुखापत झाली, ज्याचा फटका टीमला बसला. आयपीएल सुरू व्हायच्या आधीच दीपक चहर संपूर्ण मोसमातून बाहेर झाला. मोसमाच्या मध्यावरच रवींद्र जडेजाकडून कॅप्टन्सी काढून पुन्हा धोनीला कर्णधार करण्यात आलं, पण तरीही टीमचं नशीब बदललं नाही. टीममधल्या युवा खेळाडूंनी भविष्याबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत, धोनीही काही युवा खेळाडूंच्या प्रतिभेमुळे प्रभावित झाला आहे. आता पुढच्या मोसमात सीएसके पुन्हा एकदा चॅम्पियन टीमसारखी खेळेल, अशी आशा टीम आणि चाहत्यांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.