मुंबई, 3 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी (IPL 2022) जाहीर केली आहे. या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत, यानंतर आता लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबादच्या (Ahmadabad) टीम प्रत्येकी 3-3 खेळाडू रिटेन करतील, यानंतर जानेवारी महिन्यामध्ये उरलेल्या खेळाडूंसाठी लिलाव होणार आहे. लखनऊ आणि अहमदाबादच्या टीम नव्यानेच आयपीएलमध्ये दाखल झाल्या आहेत, त्यामुळे आयपीएलचा पुढचा मोसम 10 टीमचा होणार आहे. या दोन नव्या टीम आता कोणत्या खेळाडूंना विकत घेणार याबाबत वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने या 6 खेळाडूंची यादी सांगितली आहे.
केएल राहुल, राशिद खान, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, इशान किशन आणि डेव्हिड वॉर्नर हे 6 खेळाडू दोन नव्या टीमकडे जातील, असा दावा आकाश चोप्राने केला आहे. आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनलवर हे मत मांडलं आहे.
'माझी पहिली निवड केएल राहुल (KL Rahul) असेल. तो लिलावामध्ये जाणार नाही, हे निश्चित आहे. पंजाब किंग्सना त्याला रिटेन करायचं होतं, पण त्याला तिकडे राहायचं नव्हतं. तो लखनऊच्या टीममध्ये जाईल आणि त्यांचं नेतृत्व करेल,' असं आकाश चोप्रा म्हणाला.
'राशिद खान (Rashid Khan) हा दुसरा खेळाडू असेल. त्याचं नावही लिलावात जाणार नाही. राहुल प्रमाणेच त्यालाही हैदराबादसोबत राहायचं नव्हतं. दुसऱ्या फ्रॅन्चायजीने राहुलला चांगल्या पगाराची ऑफर दिली आहे,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं.
'श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अहमदाबादचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरने आधीच दिल्लीचं नेतृत्व केलं आहे, त्यामुळे तो आयपीएलच्या नव्या टीमचा कर्णधार झाला, तर आश्चर्य वाटायला नको,' असं मत आकाश चोप्राने मांडलं. तसंच श्रेयस अय्यर प्रमाणे युझवेंद्र चहलही (Yuzvendra Chahal) अहमदाबादमध्ये जाईल, असं भाकीत आकाश चोप्राने वर्तवलं. तसंच इशान किशन (Ishan Kishan) किंवा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासाठीही दोन्ही टीममध्ये स्पर्धा असेल, पण इशान किशनचा फॉर्म आणि हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा मुद्दा बघता इशान किशन नव्या टीमसोबत दिसेल, अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.
'याशिवाय डेव्हिड वॉर्नरही (David Warner) लिलावात जाणार नाही, आपण मॅच विनर असल्याचं त्याने वारंवार सिद्ध केलं आहे. त्याच्याकडे बराच अनुभव आहे, तसंच गेल्या कित्येक मोसमांमध्ये त्याने 500 पेक्षा जास्त रन केले आहेत,' असं आकाश चोप्रा म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.