मुंबई, 30 मे : कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेले यंदाच्या वर्षाच्या आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने युएईमध्ये (UAE) होणार आहेत. शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) आयपीएलचं आयोजन करण्यात येईल. बीसीसीआयने आयपीएलसाठी ठिकाण ठरवलं असलं, तरी आता त्यांच्यासमोर नवं संकट उभं राहिलं आहे, ते म्हणजे परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचं.
इंग्लंडचे क्रिकेटपटू (England Players) उरलेल्या आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीत, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एश्ले जाईल्स यांनी सांगितलं. यंदाच्या आयपीएलमध्ये इंग्लंडचे 14 खेळाडू होते, यापैकी इयन मॉर्गनला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू आयपीएल खेळण्यासाठी आले नाहीत, तर त्यांना नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) यानेही आयपीएलमधून माघार घेतल्याचं वृत्त ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी दिलं आहे. पॅट कमिन्स हादेखील कोलकात्याकडूनच खेळतो. ऑस्ट्रेलिया यंदाच्या मोसमात टी-20 वर्ल्ड कप, अफगाणिस्तानविरुद्धची एक टेस्ट मॅच आणि ऍशेस खेळणार आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाही (Cricket Australia) खेळाडूंचं व्यस्त वेळापत्रक बघता आयपीएलसाठी खेळाडू पाठवेल का, याबाबत साशंकता आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. या लीगमध्ये कायरन पोलार्डसह (Kieron Pollard) क्रिस गेल (Chris Gayle), सुनिल नारायण (Sunil Nairne), ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) आणि वेस्ट इंडिजचे इतर खेळाडू खेळणार आहेत. आयपीएलचा दुसरा टप्पा 19 किंवा 20 सप्टेंबरला सुरू व्हायची शक्यता आहे. अशात क्वारंटाईनच्या नियमांमुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलसाठी उशीरा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग ही स्पर्धा 10 दिवस आधी खेळवण्यात यावी, अशी चर्चा बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबत करत आहे. सीपीएल 10 दिवस आधी सुरू झाली तर, वेस्ट इंडिजचे खेळाडू संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध होतील, पण जर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक बदलायला नकार दिला, तर मात्र अनेक टीमना धक्का बसू शकतो.
आयपीएलमध्ये खेळणारे बहुतेक परदेशी खेळाडू हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे आहेत. त्यामुळे हेच खेळाडू उपलब्ध नसतील, तर आयपीएल टीमची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढणार आहे. बीसीसीआयने मात्र परदेशी खेळाडू उपलब्ध करण्याबाबात वेगवेगळ्या बोर्डांशी चर्चा करू असं सांगितलं आहे.
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी 29 सामने झाल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आली. आता उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्ये करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, IPL 2021, UAE