IPL सुरू ठेवण्याचा आग्रह का? जाणून घ्या आर्थिक गणित

IPL सुरू ठेवण्याचा आग्रह का? जाणून घ्या आर्थिक गणित

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) अर्ध्या मॅच झाल्या आहेत, पण आता स्पर्धेसमोर कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) अर्ध्या मॅच झाल्या आहेत, पण आता स्पर्धेसमोर कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर कोलकाता आणि बँगलोर (KKR vs RCB) यांच्यातली सोमवारी होणारी मॅच स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय चेन्नई सुपरकिंग्समधल्या (CSK) तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, हे तिन्ही सदस्य खेळाडू नसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता बायो-बबलविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

देशात वारंवार कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही आयपीएल रद्द करण्यात आली नाही. अनेकांनी या परिस्थितीमध्ये आयपीएल खेळवली जाऊ नये, अशी मागणी केली. तरीही बीसीसीआय (BCCI) आयपीएल खेळवण्याबाबत आग्रही का आहे, हे जाणून घेण्यासाठी याच्या आर्थिक गणितावर लक्ष देणं गरजेचं आहे. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार जागतिक क्रिकेटची इकोनॉमी 15 हजार कोटींची आहे, यातले 33 टक्के आयपीएलमधून येतात, म्हणजेच फक्त आयपीएलमधून जागतिक क्रिकेटला 5 हजार कोटी रुपये मिळतात. याच कारणामुळे बीसीसीआयला टी-20 लीगच्या आयोजनासाठी इतर देशांच्या बोर्डाचंही सहकार्य मिळतं.

2019 साली आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल 47 हजार कोटी एवडी होती, यावर्षी हीच रक्कम 3 हजार कोटींनी वाढून 50 हजार कोटी होईल, असा बीसीसीआयचा अंदाज आहे. बीसीसीआयने कोरोना संकटातही जवळपास 2 हजारांपेक्षा जास्त स्थानिक क्रिकेट मॅच खेळवल्या, या मॅचमध्ये उतरलेले खेळाडू, प्रशिक्षक, कर्मचारी आणि संबंधित सगळ्यांचे पैसे अजूनही देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बोर्डाची कमाई कमी होईल आणि याचा परिणाम स्थानिक क्रिकेटपर्यंत होईल.

कोरोनाच्या संकटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायला नकार दिला, पण या देशाचे खेळाडू आयपीएलसाठी भारतात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना पाठिंबा दिला, तर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही खेळाडूंना टेस्ट क्रिकेटऐवजी आयपीएल खेळण्याची सूट दिली. यावर्षी भारतीय टीम इंग्लंडचा दौरा करणार आहे, या दौऱ्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांच खूप आर्थिक नुकसान झालं आहे.

टीम इंडियाने मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कोरोनाच्या संकटात नियम पाळून 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात आली. भारताच्या या दौऱ्याची किंमत जवळपास 2 हजार कोटी रुपये एवढी होती. ऑस्ट्रेलियाने जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्याला नकार दिला तेव्हा तिकडे दिवसाला 450 जणांचा मृत्यू होत होता, तर सध्या भारतात दिवसाला 3 हजार नागरिकी मृत्यूमुखी पडत आहेत. तरीही खेळाडू आयपीएल खेळत आहेत.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 6:48 PM IST

ताज्या बातम्या