IPL 2021 : दोन खेळाडूंना कोरोना, RCB-KKR मॅच पुढे ढकलली, पाहा कुठे झाली चूक

IPL 2021 : दोन खेळाडूंना कोरोना, RCB-KKR मॅच पुढे ढकलली, पाहा कुठे झाली चूक

आयपीएलच्या 14 व्या मोसमावर (IPL 2021) कोरोनाचं संकट ओढावलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना केल्या तरीही कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) दोन खेळाडूंना या व्हायरसची लागण झाली आहे. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

  • Share this:

अहमदाबाद, 3 मे : आयपीएलच्या 14 व्या मोसमावर (IPL 2021) कोरोनाचं संकट ओढावलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना केल्या तरीही कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) दोन खेळाडूंना या व्हायरसची लागण झाली आहे. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर कोलकात्याचा सोमवारी बँगलोरविरुद्ध (KKR vs RCB) होणारा सामना स्थगित करण्यात आला. याशिवाय इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफलाही आयसोलेट करण्यात आलं आहे.

खेळाडू एवढ्या कठीण बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) असूनही त्यांना कोरोनाची लागण कशी होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आयपीएलची अर्धी स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना कोरोना झाल्याची ही पहिली घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयकडून (BCCI) खेळाडूंना आणि फ्रॅन्चायजींना ई-मेल पाठवण्यात आला होता, यामध्ये खेळाडू बायो-बबलमध्ये सुरक्षित राहतील, असा विश्वास दाखवण्यात आला. तसंच 7 दिवसांपूर्वीच बीसीसीआयने बायो-बबलचे नियम आणखी कठोर केले. खेळाडूंना प्रत्येक 5 दिवसानंतर कोरोना टेस्ट करावी लागत होती, पण नंतर प्रत्येक दोन दिवसांनी कोरोना टेस्ट व्हायला लागली. तसंच खेळाडूंना हॉटेलबाहेरून जेवण मागवण्यावरही बंदी घालण्यात आली.

कोलकात्याच्या टीमने आयपीएल सुरू व्हायच्या आधी मार्च महिन्याच्या शेवटी मुंबईमध्ये कॅम्प घेतला. इथल्याच एका हॉटेलमध्ये बायो-बबल तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी नितीश राणा (Nitish Rana) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. कॅम्प संपल्यानंतर कोलकात्याची टीम आयपीएल खेळण्यासाठी चेन्नईमध्ये दाखल झाली. इकडे खेळाडूंसाठी वेगळा बायो-बबल तयार झाला. चेन्नईमध्ये केकेआरने 18 एप्रिलला शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर टीम पुन्हा मुंबईत आली.

मुंबईमध्ये टीमसाठी पुन्हा एकदा बायो-बबल तयार करण्यात आला. इकडेच काहीतरी चूक झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिकडे तिथले काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होते. मुंबईत दोन सामने खेळल्यानंतर केकेआर अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून प्रवास केल्यामुळेही टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोलकात्याने अहमदाबादमध्ये 26 एप्रिलला पहिला आणि 29 एप्रिलला दुसरा सामना खेळला. यानंतर तिसरी मॅच 3 मे रोजी होणार होती, पण प्रवास किंवा हॉटेलमध्ये संक्रमण रोखण्यात चूक झाल्यामुळे खेळाडू संक्रमित झाल्याचं बोललं जात आहे.

ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार वरुण चक्रवर्ती अधिकृत ग्रीन चॅनलच्या माध्यमातून आपल्या खांद्याचं स्कॅनिंग करण्यासाठी आयपीएलच्या बायो-बबलबाहेर गेला होता. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयपीएलसाठी बीसीसीआयने कठोर बायो-बबल तयार केला होता. प्रत्येक टीममध्ये बीसीसीआयचे चार सुरक्षारक्षक होते, ज्यांच्यावर बायो-बबलचं योग्य पालन होत आहे का, हे पाहण्याची जबाबदारी होती. टीमच्या बायो-बबलमधून कोणत्याही खेळाडूला बाहेर जायची परवानगी देण्यात आली नाही.

बायो-बबलमध्ये असलेल्या प्रत्येक खेळाडूला ट्रॅकिंग डिव्हाईस देण्यात आलं होतं. हे डिव्हाईस घडाळ्यासारखंच आहे, एखादा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला असेल, तर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची माहिती या डिव्हाईसमधून मिळते. याशिवाय दुसऱ्या देशांमधून आलेल्या खेळाडूंना सात दिवस क्वारंटाईन ठेवण्याचा नियमही करण्यात आला होता. तरीही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 5:25 PM IST

ताज्या बातम्या