मुंबई, 28 एप्रिल : भारतात एकीकडे कोरोनाने थैमान घातलं असताना दुसरीकडे आयपीएल (IPL 2021) सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे काही क्रिकेटपटूंनी आयपीएल सोडून मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), ऑस्ट्रेलियाचा एन्ड्रयू टाय (Andrew Tye), एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांचा समावेश आहे. आयपीएल सोडून जाणारे बहुतेक खेळाडू हे ऑस्ट्रेलियन आहेत. भारतातून ऑस्ट्रेलियाला जायला विमानसेवा ठप्प झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू घरी परतण्याबाबत साशंक आहेत. या सगळ्या प्रकरणावर ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने रोखठोक भूमिका मांडली आहे.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल बायो-बबलच्या बाहेर जी परिस्थिती आहे त्याच्यासमोर हा छोटा मुद्दा असल्याचं पॉण्टिंग म्हणाला आहे. भारतात वाढणाऱ्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाने भारतातून येणारी विमानसेवा 15 मेपर्यंत बंद करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांनी स्पष्ट केलं की आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात परतण्यासाठी स्वत:ची व्यवस्था स्वत:लाच करावी लागणार आहे. ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पॉण्टिंग म्हणाला, 'ऑस्ट्रेलियन लोकांच्या भारतातून परतण्याबाबत आमच्या सरकारने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये निश्चितच काही अडचणी आहेत, पण आमचा आणि इतर ऑस्ट्रेलियन नागरिकांचा प्रवास छोटा मुद्दा आहे.'
'आम्ही रोज बाहेरच्या स्थितीबाबत विचार करतो. आम्ही नशीबवान आहोत, कारण आम्हाला खेळायला मिळत आहे, भारतीय लोकांचं आयपीएल क्रिकेट बघून मनोरंजन होत असेल, अशी अपेक्षा आहे,' अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली.
'बाहेर आणि भारतात काय चाललं आहे, हे आम्हाला माहिती आहे. आमच्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत, जे कोरोनाशी लढा देत आहेत,' असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं.
ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू आणि सध्या मुंबई इंडियन्ससोबत असलेल्या क्रिस लीनने (Chris Lynn) आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंसाठी चार्टर विमानाची सोय करावी, अशी मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली आहे.
बीसीसीआयनेही (BCCI) आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना आश्वस्त केलं आहे. खेळाडूंना घरी पोहोचवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल, तसंच जोपर्यंत प्रत्येक खेळाडू घरी पोहोचत नाही, तोपर्यंत आयपीएल स्पर्धा संपणार नाही, असं बीसीसीआयने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Delhi capitals, IPL 2021