IPL स्थगितीनंतर भारतातल्या T20 वर्ल्ड कपवरही संकट, या देशात होणार स्पर्धा!

IPL स्थगितीनंतर भारतातल्या T20 वर्ल्ड कपवरही संकट, या देशात होणार स्पर्धा!

आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर आता भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबतही (T20 World Cup) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 4 मे : भारतामध्ये कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं असतानाही बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचं (IPL 2021) आयोजन केलं. बायो-बबलमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येत असतानाही वेगवेगळ्या टीम्समध्ये कोरोनाने शिरकाव केला, अखेर बीसीसीआयला आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबतही (T20 World Cup) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलवू शकतं. स्पर्धा युएईमध्ये (UAE) खेळवली गेली, तरी वर्ल्ड कपचं आयोजन मात्र बीसीसीआयच करेल. आयसीसीने सुरुवातीलाच कोरोना संकटात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, या चर्चेत वर्ल्ड कप युएईमध्ये आयोजित करण्यात यावा, याबाबत सहमती झाली. सुरुवातीला भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप 9 ठिकाणी खेळवायचा बीसीसीआयचा मानस होता, पण आयपीएल एका महिन्याच्या आत रद्द करावी लागली. 'भारत मागच्या 70 वर्षातल्या सगळ्यात खराब आरोग्य संकटातून जात आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जागतिक स्पर्धेचं आयोजन करणं सुरक्षित नाही', असं बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं.

'भारतात सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्यामुळे बीसीसीआय आयोजन करेल, पण वर्ल्ड कप मात्र युएईमध्ये होऊ शकतो,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. काहीच दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा धोका वर्तवला होता. सध्या देशात दिवसाला कोरोनाचे 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तसंच प्रत्येक दिवशी जवळपास अडीच हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आयसीसीनेही आंतरराष्ट्रीय टीमच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

'जर स्थिती सामान्य झाली नाही, तर पुढचे 6 महिने कोणताही देश भारताचा दौरा करणार नाही. आणखी एक लाट आली तर खेळाडू आणि त्यांचं कुटुंब आणखी सतर्क होईल, त्यामुळे बीसीसीआय स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये करू शकतं. आयपीएल स्थगित झाल्यानंतर बीसीसीआय कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणार नाही. जून महिन्यात आयसीसीची बैठक होणार आहे, या बैठकीत वर्ल्ड कपबाबत अंतिम निर्णय होईल. आयपीएल रद्द झाल्यानंतर भारतात वर्ल्ड कपचं आयोजन होणं जवळपास अशक्य आहे,' असं बीसीसीआयच्या आणखी एका सूत्राने सांगितलं.

Published by: Shreyas
First published: May 4, 2021, 5:50 PM IST

ताज्या बातम्या