IPL 2021 : आयपीएल रद्द झाल्यानंतरही BCCI पुढे मोठी अडचण, खेळाडूही टेन्शनमध्ये

IPL 2021 : आयपीएल रद्द झाल्यानंतरही BCCI पुढे मोठी अडचण, खेळाडूही टेन्शनमध्ये

आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धेत खेळत असणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला.

  • Share this:

मुंबई, 4 मे : आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धेत खेळत असणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला. खेळाडूंचं आरोग्य आमची प्राथमिकता असल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं बीसीसीआयने सांगितलं. या निर्णयानंतर बोर्डासमोरच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण अनेक देशांचे खेळाडू सध्या भारतात आहेत आणि त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड (England), बांगलादेश (Bangladesh), दक्षिण आफ्रिका (South Africa), न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडिजचे (West Indies) खेळाडू खेळत होते. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे धोका टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतासोबतची विमानसेवा बंद केली आहे, तसंच भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्यांनाही प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना घरी पाठवताना बीसीसीआयला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर ब्रिटनमध्ये सरकारने 10 दिवसांचा क्वारंटाईनचा नियम केला आहे, त्यानुसार इंग्लंडमध्ये गेल्यानंतर खेळाडूला दुसऱ्या आणि आठव्या दिवशी कोरोना टेस्ट करावी लागणार आहे, तसंच सरकारने परवानगी दिलेल्या हॉटेलमध्येच त्यांना राहावं लागेल.

न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. खेळाडूंना घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल, असं बीसीसीआयने मागच्याच आठवड्यात स्पष्ट केलं होतं. युएईनेही भारतातून येणाऱ्या सगळ्या विमानांना बंदी घातली आहे. युएईवरून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणं सोपं पडतं, पण आता बीसीसीआयला नवा मार्ग शोधावा लागेल. या परिस्थितीमध्ये बोर्डाला खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय करावी लागू शकते.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार एका परदेशी खेळाडूने मायकल स्लेटरसोबत (Michael Slater) चर्चा केली. यानंतर खेळाडूने आता आम्हाला इकडे राहायचं नाही, असं सांगितलं. तसंच बीसीसीआय आणि आयपीएल आम्हाला घरी पाठवण्याची सोय करेल, असा विश्वास दर्शवला. आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणारा मायकल स्लेटर कोरोनामुळे स्पर्धा अर्धवट सोडून निघाला, पण ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी केल्यामुळे तो सध्या मालदीवमध्येच अडकला आहे.

Published by: Shreyas
First published: May 4, 2021, 6:26 PM IST

ताज्या बातम्या