IPL 2021 : आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅच कधी होणार? BCCI कडे आहे हा पर्याय

IPL 2021 : आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅच कधी होणार? BCCI कडे आहे हा पर्याय

क्रिकेटपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 4 मे : क्रिकेटपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांना कोरोनाची लागण झाली, यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि इतर दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर मंगळवारी हैदराबादचा (SRH) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अमित मिश्रा (Amit Mishra) यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं, त्यामुळे बीसीसीआयला (BCCI) हा निर्णय घ्यावा लागला.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आता पुढचे सामने कधी खेळवण्यात येणार, याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण स्पर्धा लवकर सुरू होणार नाही हे निश्चित आहे. पुढच्या महिन्यात भारतीय टीम इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळणार आहे. यानंतर भारत ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्येच 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल. 12 ऑगस्टपासून या सीरिजला सुरूवात होईल. प्रोटोकॉलनुसार खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, त्यामुळे टेस्ट सीरिजआधी आयपीएलचं आयोजन होऊ शकणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिज 14 सप्टेंबरला संपणार आहे.

भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) आयोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत भारतात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर आयपीएलचे उरलेले 31 सामने खेळवले जाऊ शकतात, त्यामुळे सगळ्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या तयारीचीही संधी मिळेल. 10 ते 12 दिवसांमध्ये आयपीएलचे उरलेले सामने खेळवता येतील. तसंच वर्ल्ड कपचं आयोजन भारताऐवजी युएईमध्ये झालं, तर मागच्यावर्षी प्रमाणे आयपीएलच्या उरलेल्या मॅच तिकडेही खेळवल्या जाऊ शकतात.

आयपीएलच्या भविष्याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) म्हणाले, 'वर्षभरात पुढे कधी आयपीएलचं आयोजन करता येऊ शकेल का? हे आम्ही बघू, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही स्पर्धेचं आयोजन करू शकत नाही.'

भारतातल्या कोरोनाच्या संकटामुळे मागच्या वर्षाची आयपीएल युएईमध्ये खेळवली गेली होती, तेव्हा बोर्डाला 4 हजार कोटींच्या महसुलाची अपेक्षा असल्याचं बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमळ यांनी सांगितलं होतं, यावेळीही बोर्डाची तेवढ्याच उत्पन्नाची अपेक्षा असेल, पण स्पर्धा रद्द झाल्यामुळे ब्रॉडकास्टर, बोर्ड यांच्यासह टायटल स्पॉन्सर यांनाही धक्का बसला आहे. मागच्या एका महिन्यात देशात कोरोनाची स्थिती आणखी खराब झाली आहे. देशभरात दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत, तसंच प्रत्येक दिवशी जवळपास अडीच हजार मृत्यू होत आहेत.

Published by: Shreyas
First published: May 4, 2021, 4:00 PM IST

ताज्या बातम्या