IPL 2021 : ...म्हणून 16.25 कोटींच्या मॉरिसला सॅमसनने शेवटच्या बॉलवर स्ट्राईक दिली नाही!

IPL 2021 : ...म्हणून 16.25 कोटींच्या मॉरिसला सॅमसनने शेवटच्या बॉलवर स्ट्राईक दिली नाही!

आयपीएलच्या (IPL 2021) रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा (Punjab Kings vs Rajasthan Royals) पराभव केला. राजस्थानला शेवटच्या दोन बॉलवर विजयासाठी 5 रनची गरज होती, तेव्हा त्यांचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि क्रिस मॉरिस (Chris Morris) मैदानात होते.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा (Punjab Kings vs Rajasthan Royals) पराभव केला. राजस्थानला शेवटच्या दोन बॉलवर विजयासाठी 5 रनची गरज होती, तेव्हा त्यांचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि क्रिस मॉरिस (Chris Morris) मैदानात होते, पण संजू सॅमसनने मॉरिसला स्ट्राईक दिला नाही, त्यामुळे राजस्थानला शेवटच्या बॉलवर 5 रन आवश्यक होते, तेव्हा अर्शदीपच्या बॉलिंगवर सॅमसनने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बाऊंड्री लाईनवर दीपक हुडाने त्याचा कॅच पकडला आणि राजस्थानला सामना गमवावा लागला.

क्रिस मॉरिसला राजस्थानने 16.25 कोटी रुपयांची बोली लावून लिलावात (IPL Auction 2021) विकत घेतलं. याचसोबत आयपीएल इतिहासात सर्वाधिक रक्कम मिळवणाच्या इतिहास मॉरिसच्या नावावर झाला. लिलावात एवढे पैसे देऊन बोली लावलेल्या मॉरिसवर राजस्थानच्या कर्णधाराचाच विश्वास नाही का? असा प्रश्न सॅमसनने त्याला स्ट्राईक न दिल्यामुळे विचारला जाऊ लागला. पण राजस्थान टीमचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकाराने (Kumar Sangakara) यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

संजू सॅमसनने मॅच संपवण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. आपण स्वत: सिक्स मारून ही मॅच संपवू शकू, असा विश्वास सॅमसनला होता, त्याचा हा निर्णय योग्य होता, असं संगकारा म्हणाला.

'कधी कधी तुम्ही बॉल चांगल्या पद्धतीने मारत असता, तसंच तुम्ही फॉर्ममध्येही असता तेव्हा तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवता आणि सगळी जबाबदारी स्वत:वर घेता. संजूला हे करताना बघून मला बरं वाटलं. तुम्ही नेहमीच छोटी-मोठी चूक करता, पण माझ्यासाठी खेळाडूचा विश्वास, त्याचा दृष्टीकोन आणि त्याचं समर्पण महत्त्वाचं आहे, कारण आपली ताकद काय आहे हे त्याला माहिती आहे,' अशी प्रतिक्रिया संगकाराने दिली.

मॅच संपवण्याची जबाबदारी संजूने स्वत:च्या खांद्यावर घेतली, फक्त काही मीटरमुळे त्याला सिक्स मारता आली नाही, पण पुढच्यावेळी तो सिक्स मारून मॅच जिंकवेल, असा विश्वास संगकाराने व्यक्त केला.

मागच्या काही वर्षांपासून संजू सॅमसन आयपीएलची धडाक्यात सुरूवात करतो, पण त्याला संपूर्ण स्पर्धेत सातत्य ठेवता येत नाही, याबद्दलही संगकाराला विचारण्या आलं. 'संजू साधारण खेळाडू नाही, अनेकवेळा त्याच्या स्थिरतेबाबत चर्चा होते, पण प्रत्येक मॅचच्या हिशोबाने तुम्हाला तुमचा खेळ बदलावा लागतो. अनेकवेळा तुम्ही जास्त धोका पत्करता,' असं वक्तव्य संगकाराने केलं.

पंजाबने या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 221 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या मोबदल्यात 217 रन केले. सॅमसनने 63 बॉलमध्ये 119 रनची अफलातून खेळी केली. आता राजस्थानची पुढची मॅच 15 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 5:10 PM IST

ताज्या बातम्या