मुंबई, 12 एप्रिल : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याचं वादळी शतक फुकट गेलं आहे, कारण रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 4 रनने विजय झाला आहे. पंजाबने ठेवलेलं 222 रनचं आव्हान गाठताना राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 217-7 रन करता आले. शेवटच्या बॉलला 5 रनची गरज असताना संजू सॅमसन 119 रनवर आऊट झाला. 63 बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये सॅमसनने 12 फोर आणि 7 सिक्स मारले. सॅमसनशिवाय राजस्थानकडून जॉस बटलरने 25 रन, शिवम दुबेने 23 रन, रियान परागने 25 रन केले. तर पंजाबकडून अर्शदीप सिंगने 3 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला 2 आणि जाय रिचर्डसन, रिले मेरेडिथला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
केएल राहुल (KL Rahul) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला (Punjab Kings vs Rajasthan Royals) 222 रनचं आव्हान दिलं होतं. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून पंजाबला पहिले बॅटिंगला बोलावलं, यानंतर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 221 रन केले. कर्णधार केएल राहुलने 50 बॉलमध्ये 91 रन केले, तर दीपक हुडाने 28 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. राहुलने 5 सिक्स तर हुडाने 6 सिक्स मारले. क्रिस गेलने 28 बॉलमध्ये 40 रन केले. राजस्थानकडून चेतन सकारियाला 3 विकेट मिळाल्या, तर क्रिस मॉरिसला 2 आणि रियान परागला एक विकेट घेण्यात यश आलं.
कर्णधार म्हणून संजू सॅमसनचा हा पहिलाच सामना होता. मागच्या मोसमात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) राजस्थानचा कर्णधार होता, पण लिलावाआधी त्यांनी स्मिथला सोडून दिलं. आजच्या सामन्यात राजस्थानने जॉस बटलर, बेन स्टोक्स, क्रिस मॉरिस आणि मुस्तफिजूर रहमान या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तर पंजाबच्या टीममध्ये क्रिस गेल, निकोलस पूरण, जाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ या परदेशी खेळाडूंना स्थान मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Punjab kings, Rajasthan Royals