मुंबई, 9 मार्च : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा बीसीसीआयने (BCCI) रविवारी केली, पण यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) यांनी आयपीएलच्या या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यंदाच्या वर्षीची आयपीएल स्पर्धा फक्त 6 ठिकाणी खेळवली जाणार आहे, यात मोहालीला स्थान देण्यात आलेलं नाही. पण कोरोनाचे (Corona Virus) सर्वाधिक रुग्ण सापडत असूनही मुंबईमध्ये (Mumbai) सामने होणार आहेत.
आयपीएलच्या या ठिकाणांवरून अमरिंदर सिंग यांनी बीसीसीआयला पत्र लिहिलं आहे. मुंबईमध्ये आयपीएलचं आयोजन होऊ शकतं, जिकडे दिवसाला 9 हजार रुग्ण सापडत आहेत. पण तुम्ही मोहालीमध्ये सामने ठेवू शकत नाही. आम्ही आयपीएलदरम्यान सगळी काळजी घेऊ. मोहाली पंजाब किंग्जचं होम ग्राऊंड आहे, असं अमरिंदर सिंग या पत्रात म्हणाले. याआधी पंजाब टीमचे सहमालक नेस वाडिया यांनीही मोहालीचा समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल 6 ठिकाणीच खेळवण्यात येणार आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होईल. चेन्नई, मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आणि बँगलोरमध्ये या मोसमाच्या सगळ्या मॅच खेळवल्या जातील. 30 मे रोजी आयपीएलची फायनल होईल. यावेळी कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात खेळता येणार नाही. तसंच सुरूवातीच्या काळात प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश नसेल. कोरोनाचा प्रभाव बघून शेवटच्या टप्प्यामध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
मागच्यावर्षी कोरोनामुळेच आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी मुंबई आणि बँगलोर यांच्यामध्ये आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. गतविजेती मुंबई चेन्नईमध्ये सर्वाधिक 5 मॅच खेळणार आहे.