Home /News /sport /

IPL 2021 : आयपीएल स्थगित, पण खेळाडूंना पैसे मिळणार का? जाणून घ्या

IPL 2021 : आयपीएल स्थगित, पण खेळाडूंना पैसे मिळणार का? जाणून घ्या

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) यंदाच्या मोसमातली आयपीएल स्पर्धा (IPL 2021) काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धा स्थगित झाल्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि ब्रॉडकास्टर यांचं मोठं नुकसान होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 मे : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) यंदाच्या मोसमातली आयपीएल स्पर्धा (IPL 2021) काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धा स्थगित झाल्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि ब्रॉडकास्टर यांचं मोठं नुकसान होणार आहे, पण खेळाडूंचं मात्र कोणतंही नुकसान होणार नाही. खेळाडूंना यावर्षी मानधन म्हणून 483 कोटी रुपये मिळणार होते, यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार खेळाडूंचं मानधन फ्रॅन्चायजींच्या इन्श्यूरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट असतं. जर खेळाडूला दुखापत झाली किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे जर खेळाडूला खेळता आलं नाही, तरी त्याला त्याचं मानधन दिलं जातं. त्यामुळे यावर्षी खेळाडूंना 483 कोटी रुपये मिळतील. खेळाडूंना मानधन तीन हिश्श्यांमध्ये दिलं जातं, यातला पहिला हिस्सा त्यांना देण्यात आला आहे, तर उरलेले दोन हिस्से स्पर्धा संपल्यानंतर दिला जातो. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 60 पैकी 29 सामने झाले, तर 31 सामने स्थगित करण्यात आले. भारतामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट यायची शक्यता आहे, त्यामुळे भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कपही युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो, तसंच वर्ल्ड कप झाल्यानंतर लगेच युएईमध्येच आयपीएलचे उरलेले सामने खेळवले जाऊ शकतात. आयपीएल स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला जवळपास 2200 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. स्पर्धेची फायनल 30 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार होती, पण 24 दिवस आणि 29 मॅचनंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. या वर्षात वेळ मिळाला, तर आयपीएलचं पुन्हा आयोजन करू, पण सध्या तशी परिस्थिती नाही, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 चं यशस्वी आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं. भारतामध्ये सध्या दिवसाला कोरोनाचे तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत, तर तीन हजारांपेक्षा जास्त जणांचा रोज कोरोनामुळे मृत्यू होत आहे. केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), संदीप वॉरियर (Sandeep Warrior) तसंच दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra), हैदराबादचा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि प्रशिक्षक माईक हसी (Mike Hussey) यांनाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Coronavirus, Cricket, IPL 2021

    पुढील बातम्या