दुबई, 7 ऑक्टोबर : क्रिकेटपटूला आपल्या कॅप्टनवर विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नसतं. अनेकवेळा कॅप्टनवर अशाप्रकारे आंधळा विश्वास ठेवणं खेळाडूला महागही पडू शकतं. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) ओपनर मयंक अग्रवालच्याबाबतीतही (Mayank Agarwal) असंच झालं आहे. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK vs PBKS) सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) मोठी चूक केली, याची शिक्षा मात्र मयंक अग्रवालला भोगावी लागली.
चेन्नईने दिलेलं 135 रनचं आव्हान पार करण्यासाठी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल ही पंजाबची ओपनिंग जोडी मैदानात उतरली. या दोघांनी पंजाबला 4.3 ओव्हरमध्येच 46 रनची पार्टनरशीप करून दिली, पण केएल राहुलच्या चुकीमुळे ही पार्टनरशीप तुटली. शार्दुल ठाकूरने टाकलेला बॉल मयंक अग्रवालच्या पायाला लागला, यानंतर चेन्नई सुपर किंग्सने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. अंपायरनेही मयंकला आऊट दिलं. यानंतर मयंक राहुलकडे गेला आणि डीआरएस घ्यायचा का नाही, हे विचारलं. राहुलने डीआरएस घ्यायला नकार दिला.
केएल राहुलने डीआरएस न घ्यायचा सल्ला दिल्यानंतर मयंक पॅव्हेलियनमध्ये परतला, पण जेव्हा पंजाबच्या टीमने रिप्ले बघितला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला, कारण रिप्लेमध्ये बॉल लेग स्टम्पच्या बाजूने जात असल्याचं दिसलं. राहुलने जर मयंकला डीआरएस घ्यायला लावला असता तर त्याला जीवनदान मिळालं असतं. 12 बॉलमध्ये 12 रन करून मयंक अग्रवाल आऊट झाला.
चेन्नई प्ले-ऑफमध्ये
आयपीएल 2021 च्या प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) चेन्नईची टीम आधीच पोहोचली आहे, तर पंजाबचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईने 13 पैकी 9 मॅच जिंकल्या आणि 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. 18 पॉईंट्ससह एमएस धोनीची टीम दुसऱ्या क्रमांकावर (IPL Points Table) आहे. दुसरीकडे पंजाबने 13 पैकी 5 सामने जिंकले आणि 8 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. 10 पॉईंट्ससह पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि पंजाबची यंदाच्या आयपीएलच्या लीग स्टेजमधली ही शेवटची मॅच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, Kl rahul, Punjab kings