मुंबई, 28 एप्रिल : कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आयपीएलमुळे (IPL 2021) काही परदेशी क्रिकेटपटूंनी स्पर्धा सोडून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), ऑस्ट्रेलियाचा एन्ड्रयू टाय (Andrew Tye), एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांचा समावेश आहे. न्यूझीलंड (New Zealand) आणि दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) खेळाडू मात्र अजूनही आयपीएल खेळत आहेत, त्यातच आता न्यूझीलंडच्या खेळाडूंबाबत नवी माहिती समोर येत आहे. आयपीएल संपल्यानंतरही न्यूझीलंडचे खेळाडू भारतातच थांबणार आहेत.
इंग्लंडमध्ये जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगेल. यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम एकत्रच इंग्लंडला रवाना होऊ शकते. क्वारंटाईनच्या कठोर नियमांमुळे खेळाडूंना न्यूझीलंडला जाणं शक्य नाही, त्यामुळे ते भारतातच थांबतील.
केन विलियमसन, ट्रेन्ट बोल्ट, काईल जेमिसन आणि मिचेल सॅन्टनर न्यूझीलंडच्या 10 खेळाडूंमध्ये आहेत, जे आयपीएल खेळत आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला सुरुवात होणार आहे. यासाठी न्यूझीलंड 15 सदस्यांच्या टीमची निवड करणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिजही होणार आहे. ही सीरिज 2 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होईल.
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडूंच्या संघटनेचे प्रमुख हिथ मिल्स म्हणाले, 'ते घरी परतू शकत नाहीत, कारण त्यांना दोन आठवडे क्वारंटाईन व्हावं लागेल. आयपीएलच्या लीग स्टेज संपेपर्यंत खेळाडू भारतातच आहेत, पण त्यानंतरही ते भारतातच राहू शकतात. आम्ही न्यूझीलंड क्रिकेटशी बोलत आहोत, तसंच बीसीसीआय आणि आयसीसीच्याही संपर्कात आहोत. भारतातून न्यूझीलंडसाठीच्या विमानसेवा बंद झाल्यामुळे खेळाडू चिंतेत आहेत, पण कोणीही घरी परतण्याचे संकेत दिले नाही. 11 एप्रिलपासून विमानसेवा बंद करण्यात आली होती, पण बुधवारी रात्रीपासून विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.'
'खेळाडूंना बायो-बबलमध्ये सुरक्षित वाटत आहे. एका हॉटेलमध्ये 4 टीम आहेत आणि हॉटेलमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीच धोका आहे, पण सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत. सगळे खेळाडू सुरक्षित बबलमध्ये आहेत,' असं मिल्स यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, New zealand