Home /News /sport /

IPL 2021 : मागच्यावेळची चॅम्पियन, पण यंदा मुंबईला का बदलावी लागली रणनिती?

IPL 2021 : मागच्यावेळची चॅम्पियन, पण यंदा मुंबईला का बदलावी लागली रणनिती?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी ठिकठाकच म्हणावी लागेल. मुंबईने या मोसमात खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 3 मध्ये त्यांच्या विजय झाला, तर 3 सामने त्यांना गमवावे लागले.

    नवी दिल्ली, 1 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी ठिकठाकच म्हणावी लागेल. मुंबईने या मोसमात खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 3 मध्ये त्यांच्या विजय झाला, तर 3 सामने त्यांना गमवावे लागले. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन बनणाऱ्या मुंबईसाठी ही कामगिरी नक्कीच साजेशी नाही. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अर्धी आयपीएलच झालेली असताना मुंबईने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सगळे 8 परदेशी खेळाडू मैदानात उतरवले, तर मागच्या संपूर्ण मोसमात मुंबईने फक्त 5 परदेशी खेळाडूंना संधी दिली होती. मुंबईकडून या मोसमात क्रिस लीन, मार्को जेनसन, क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड, जेम्स नीशम, एडम मिल्ने, ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल या सगळ्यांना संधी देण्यात आली. मागच्या मोसमात मात्र क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड, ट्रेन्ट बोल्ट, कुल्टर नाईल आणि जेम्स पॅटिनसन या पाच परदेशी खेळाडूंनाच मुंबईने खेळवलं होतं. क्रिस लीन, शरफेन रदरफोर्ड आणि मिचेल मॅकलेनघन हे खेळाडू एकही सामना खेळले नव्हते. परदेशी खेळाडू वापरण्याची कारणं काय? आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स टीममध्ये फार बदल न करण्यासाठी ओळखली जाते, किंबहुना टीममध्ये फार बदल केले जात नाहीत, म्हणूनच मुंबई यशस्वी होते, असं क्रिकेट तज्ज्ञांनी अनेकवेळा सांगितलं, पण यंदा मात्र मुंबईला टीममध्ये बदल करण्यापासून पर्याय नव्हता. खेळाडू क्वारंटाईन आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने क्रिस लीन याला संधी दिली. दक्षिण आफ्रिकेतून क्विंटन डिकॉक उशीरा दाखल झाल्यामुळे लिनला संधी देण्यात आली, पण डिकॉक उपलब्ध झाल्यानंतर मात्र लिनला बाहेर बसावं लागलं. होम ग्राऊंडवर सामने नाहीत कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल फक्त 6 ठिकाणी खेळवण्यात येत आहे, त्यामुळे एकाही टीमला त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळता येणार नाही. मुंबईने त्यांचे सुरुवातीचे 5 सामने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर खेळले, त्यामुळे कुल्टर-नाईल, एडम मिल्ने आणि मार्को जेनसन या फास्ट बॉलरना फार यश मिळालं नाही, अखेर चेन्नईच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये रोहितने फक्त 3 परदेशी खेळाडूंना संधी द्यायचा निर्णय घेतला. पांड्या बंधूंचा फॉर्म आयपीएलच्या यंदाच्या मोसमात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना संघर्ष करावा लागला आहे. ऑलराऊंडर असलेला हार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीमुळे बॉलिंग करू शकत नाही, त्यामुळे बॉलिंग आणि बॅटिंग आणखी मजबूत करण्यासाठी चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने जेम्स नीशम या ऑलराऊंडरला खेळवलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या