मुंबई, 19 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबईची टीम (Mumbai Indians) विजयाच्या मार्गावर परतली. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात शेवटच्या बॉलवर पराभूत झाल्यानंतर मुंबईचा कोलकाता (KKR) आणि हैदराबादविरुद्ध (SRH) विजय झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही, पण त्यांच्या बॉलरनी भेदक बॉलिंग करत मुंबईला जिंकवून दिलं. मुंबईच्या बॉलरच्या या कामगिरीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) खूश झाला आहे. मुंबईकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नावाचं ब्रम्हास्त्र असल्याचं सेहवाग म्हणाला आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन एक विकेट घेतली. सामन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा 17 व्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त 3 रन दिले.
जोपर्यंत मुंबईकडे बुमराह नावाचं ब्रम्हास्त्र आहे, तोपर्यंत त्यांचा पराभव अशक्य असल्याचं सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणला. जेव्हा मुंबईचा पराभव झाला तेव्हा विरोधी टीमने सुरुवातीपासूनच बुमराहवर आक्रमण केलं, अशी प्रतिक्रियाही सेहवागने दिली.
कोलकाता आणि हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या बॉलरनी 150 रनचं छोटं आव्हान यशस्वीरित्या वाचवलं. मुंबईकडे छोटं आव्हान वाचवणारे तसंच मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणारे खेळाडू आहेत, त्यामुळे ही आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असल्याचं सेहवाग म्हणाला.
'जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) जेव्हा कृणाल पांड्यावर (Krunal Pandya) आक्रमण केलं, तेव्हा रोहितने पोलार्डच्या (Pollard) हातात बॉल दिला. हैदराबादने जसा शंकरचा वापर केला, तसंच मुंबईनेही पोलार्डचा वापर करण्याचं ठरवलं. या खेळीपट्टीवर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या स्लो बॉलमुळेही उपयोगी पडला असता. पाठीच्या दुखण्यामुळे पांड्याच्या बॉलिंगचा वेग कमी झाला आहे, पण मुंबईने त्याला बॉलिंग दिली नाही. स्पर्धेत मुंबई सर्वोत्तम टीम आहे, कारण ते छोटं आव्हानही इतर टीमना गाठू देत नाहीत, तसंच मोठ्या आव्हानाचाही पाठलाग करतात,' असं वक्तव्य सेहवागने केलं.
बुमराहशिवाय बोल्ट (Trent Boult) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बोल्टने हैदराबादविरुद्ध 3.4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर राहुल चहरने 4 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. कोलकात्याविरुद्धही चहरला 3 विकेटच मिळाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Jasprit bumrah, Mumbai Indians, Virender sehwag