मुंबई, 26 एप्रिल : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सुरुवातीच्या काळात सोशल मीडियावर सक्रीय होता, पण मागच्या काही वर्षांमध्ये तो यापासून लांब आहे, पण तरीही त्याचं 8 वर्ष जुनं ट्वीट व्हायरल झालं आहे. धोनीचं हे ट्वीट व्हायरल व्हायचं कारण ठरलं, ते रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आयपीएलमध्ये (IPL 2021) केलेली वादळी खेळी. जडेजाच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नईने बँगलोरचा (CSK vs RCB) 69 रननी पराभव केला. या सामन्यानंतर धोनीचं 8 वर्षांआधीचं जुनं ट्वीट चाहत्यांनी व्हायरल केलं. 9 एप्रिल 2013 साली धोनीने हे ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये धोनीने जडेजाची तुलना भारतीय चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार रजनीकांतसोबत केली. देवाला रजनीकांत म्हातारे झाल्यासारखे वाटले, त्यामुळे त्याने सर रविंद्र जडेजाला बनवलं, असं ट्वीट धोनीने केलं.
God realised RAJNI sir is getting old so he created sir ravindra jadeja
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) April 9, 2013
जडेजाने बँगलोरविरुद्धच्या सामन्यात 6 बॉलमध्येच मॅचचं चित्र पलटवून टाकलं. 20 व्या ओव्हरमध्ये जडेजाने हर्षल पटेलच्या बॉलिंगवर 37 रन केले, यामध्ये 5 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. तसंच बॉलिंगमध्येही त्याने 13 रन देऊन 3 विकेट घेतल्या आणि एक रन आऊटही केला.
'मी शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल हिट करण्याचा विचार करत होतो. धोनीने मला आधीच सांगितलं होतं, हर्षल पटेल ऑफ स्टम्पवर बॉलिंग करेल, त्यामुळे मी तयार होतो. माझ्या बॅटला बॉल बरोबर लागत होता, त्यामुळे आम्हाला एवढा स्कोअर करता आला. शेवटची ओव्हर आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. जर मी स्ट्राईकवर राहिलो, तर जास्त रन काढू शकतो, हे मला माहिती होतं. या कामगिरीमुळे मी खूश आहे,' अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.
रविवारी दुपारी झालेल्या या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 191 रन करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 122 रन केले. या विजयासोबतच चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni, Ravindra jadeja