मुंबई, 28 एप्रिल : क्रिकेटमध्ये फास्ट बॉलिंगचा विचार केला, तर आपल्यासमोर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानच्या बॉलर्सचं चित्र उभं राहायचं, पण गेल्या काही वर्षांमध्ये भारतातूनही फास्ट बॉलर्स नावारुपाला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) तर कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) या आंतरराष्ट्रीय दिग्गज फास्ट बॉलर्सनाही भारतीय फास्ट बॉलर तगडी टक्कर देत आहेत. बँगलोरचा (RCB) मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि कोलकात्याचा (KKR) प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांनी या आयपीएलमध्ये रबाडा आणि कमिन्स यांच्या तोडीस तोड बॉलिंग केली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या टॉप-10 फास्ट बॉलमध्ये मोहम्मद सिराजने टाकलेला बॉल चौथ्या क्रमांकावर आहे, तर प्रसिद्ध कृष्णाचे तीन बॉल या यादीत आहेत. मंगळवारी बँगलोर आणि दिल्लीत झालेल्या सामन्यामध्ये कागिसो रबाडाने या मोसमातला सगळ्यात फास्ट बॉल टाकला. रबाडाने टाकलेला हा बॉल 148.73 किमी प्रती तास या वेगाचा होता. तर पंजाबच्या क्रिस जॉर्डनने 148.47 किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला. मोहम्मद सिराजने टाकलेला 147.67 किमी प्रती तास हा बॉल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर प्रसिद्ध कृष्णाचा 146.60 किमी प्रती तास या वेगाने टाकलेला बॉल आठव्या क्रमांकावर आहे.
दिल्लीचा एनरिच नॉर्किया आणि राजस्थानचा जोफ्रा आर्चर खेळले नसल्यामुळेही मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा फायदा झाला आहे, कारण हे दोन्ही फास्ट बॉलर 150 किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग करू शकतात.
मोहम्मद सिराजने या मोसमात 34 पेक्षा जास्त बॉल 140 किमी प्रती तासापेक्षा जास्त वेगाने टाकले आहेत. आयपीएलच्या 2020 च्या मोसमात सिराजने 9 सामन्यांमध्ये 6 यॉर्कर टाकले होते, तर आयपीएलच्या यंदाच्या मोसमात त्याने पहिल्या 5 सामन्यांमध्येच 12 यॉर्कर टाकले आहेत.
IPL 2021 मधले टॉप-10 फास्ट बॉल
कागिसो रबाडा- 148.73
क्रिस जॉर्डन- 148.47
कागिसो रबाडा- 148.40
मोहम्मद सिराज- 147.67
कागिसो रबाडा- 147.62
कागिसो रबाडा- 146.85
पॅट कमिन्स- 146.71
प्रसिद्ध कृष्णा- 146.60
प्रसिद्ध कृष्णा- 146.58
प्रसिद्ध कृष्णा- 146.28
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.