मुंबई, 6 जानेवारी : बीसीसीआय (BCCI) ने आयपीएल (IPL 2021) च्या यावर्षीच्या मोसमाची तयारी सुरू केली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये या आयपीएलसाठी छोटा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत आयपीएल 2021 साठीची ट्रेडिंग विन्डोही ओपन करण्यात आली आहे. आयपीएल टीम त्यांच्या खेळाडूंना 21 जानेवारीपर्यंत रिलीज करू शकतात. बीसीसीआयला यंदाच्या आयपीएलचं आयोजन भारतातच करायचं आहे, पण युएईचा पर्याय सुरक्षित ठेवण्यात आला आहे. कोरोनामुळे आयपीएल 2020 चं आयोजनही युएईमध्ये करण्यात आलं होतं.
मुंबई मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या 14व्या मोसमासाठीचा छोटेखानी लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. आयपीएलच्या या मोसमात 10 टीम सहभागी होतील आणि खेळाडूंचा मोठा लिलाव होईल, असं सांगण्यात येत होतं, पण वेळ कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी हे बदल केले जातील, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार बोर्डाला यावर्षी आयपीएल भारतातच खेळवायचं आहे. पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं आयोजन कसं होतं, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला सुरूवात होणार आहे. याच स्पर्धेने कोरोनानंतरच्या भारतातल्या क्रिकेटला सुरूवात होईल.
आयपीएल लिलावाआधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धा आयपीएल टीमसाठीही महत्त्वपूर्ण आहे. या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या नवोदित खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी किंमत मिळण्याची संधी आहे. ही स्पर्धा मुंबई, कोलकाता, बंगळुरू, बडोदा, इंदूर आणि चेन्नईमध्ये होईल. नॉकआऊट मॅच अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.