नवी दिल्ली, 1 मे : कायरन पोलार्डच्या (Kieron Pollrad) वादळी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (CSK vs Mumbai Indians) रोमांचक विजय मिळवला आहे. 219 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 रनची गरज होती, तेव्हा पोलार्ड आणि धवल कुलकर्णी मैदानात होते, पण पोलार्डने धवलला स्ट्राईक न देता लुंगी एनगिडीच्या ओव्हरला 16 रन काढले. मुंबईचा आयपीएल इतिहासातला हा सगळ्यात यशस्वी पाठलाग होता. पोलार्डने 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली, यामध्ये त्याने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. तब्बल 255.88 च्या स्ट्राईक रेटने पोलार्डने बॅटिंग केली. क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 7.4 ओव्हरमध्ये 71 रन केले. डिकॉक 38 आणि रोहित 35 रन करून आऊट झाला. तर कृणाल पांड्याने 32 आणि हार्दिक पांड्याने 7 बॉलमध्ये 16 रन करून पोलार्डला साथ दिली. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मोईन अली, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याची वादळी खेळी आणि फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis), मोईन अलीच्या (Moeen Ali) अर्धशतकामुळे चेन्नईने मुंबईला (CSK vs Mumbai Indians) विजयासाठी 219 रनचं आव्हान दिलं आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून चेन्नईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 218/4 एवढा स्कोअर केला. अंबाती रायुडूने 27 बॉलमध्ये नाबाद 72 रनची खेळी केली, यामध्ये 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. रायुडूने तब्बल 266.77 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. मुंबईकडून कायरन पोलार्ड सगळ्यात यशस्वी ठरला, त्याने 2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर बोल्टला आणि बुमराहला 1-1 विकेट मिळाली. रायुडूशिवाय मोईन अलीने 36 बॉलमध्ये 58 आणि फाफ डुप्लेसिसने 28 बॉलमध्ये 50 रन केले.
या सामन्यातून न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham) मुंबईसाठी पदार्पण करत आहे. याआधी मागच्या मोसमात नीशम पंजाबच्या टीममध्ये होता. नॅथन कुल्टर नाईलऐवजी नीशमला संधी देण्यात आली आहे. तसंच जयंत यादवऐवजी धवल कुलकर्णीचा (Dhawal Kulkarni) समावेश करण्यात आला आहे. तर चेन्नईने त्यांच्या टीममध्ये एकही बदल केलेला नाही.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नईने लागोपाठ 5 विजय मिळवले होते, पण या सामन्यात त्यांचा पराभव झाला, तर मुंबईचा 7 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मात्र कोणताही फरक पडलेला नाही. चेन्नई सुपरकिंग्स पहिल्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma