नवी दिल्ली, 26 एप्रिल : भारतात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे काही परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून (IPL 2021) माघार घेतली आहे. यामध्ये राजस्थानचा (Rajasthan Royals) लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), एन्ड्रयू टाय (Andrew Tye) तसंच बँगलोरच्या (RCB) केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि एडम झम्पाचा (Adam Zampa) समावेश आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कोरोनाच्या भीतीने मायदेशी परतत असतानाच मुंबई इंडियन्सचा (Mumbai Idians) ऑस्ट्रेलियन खेळाडू नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile) याने माघार घ्यायला नकार दिला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये घरी जाण्याऐवजी मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्येच आपल्याला सुरक्षित वाटत असल्याचं कुल्टर नाईल म्हणाला. मुंबईने कुल्टर नाईलला लिलावात 5 कोटी रुपयांना विकत घेतलं.
ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या आठवड्यापासून दर दिवसाला कोरोनाचे 20 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत, तर भारतात हीच संख्या एक लाखाच्या घरात आहे.
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूशी बोलताना कुल्टर नाईल म्हणाला, 'टाय, झम्पा आणि रिचर्डसन घरी जात असल्याचं बघून मला आश्चर्य वाटलं, पण त्यांनी हा निर्णय का घेतला, हे मी समजू शकतो. मी झम्पासोबत बोललो, त्याने मला घरी जायचं कारण सांगितलं. पण माझ्यासाठी सध्या घरी जाण्यापेक्षा बायो-बबलच सेफ आहे.'
भारतामधून सध्या परदेशात जाणं कठीण आहे. कारण ब्रिटन आणि न्यूझीलंडसारख्या देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले आहेत, तसंच ऑस्ट्रेलियाही याबाबत विचार करत आहे. 'जरी घरी परतायचं असेल, तर मला दोन आठवडे दुबईमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल, पण लवकरच या अडचणी दूर होतील, असा विश्वास कुल्टर नाईलने व्यक्त केला. आयपीएलमध्ये माझी दिवसाला तीन वेळा टेस्ट होते, आयपीएलच्या बायो-बबलवर माझा विश्वास आहे, असं कुल्टर नाईलने सांगितलं.
'रोज सकाळी, दुपारी आणि पुन्हा रात्री आमची टेस्ट होते. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, लॉन्ड्री आणि सफाई कर्मचारी यांचीही तेवढेच वेळा टेस्ट केली जाते, त्यामुळे बायो-बबलवर माझा विश्वास आहे. सगळे नियम पाळले जात आहेत, यापेक्षा जास्त कोणीच काही करू शकणार नाही,' असं कुल्टर नाईल म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, IPL 2021, Mumbai Indians