नवी दिल्ली, 20 मार्च : कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची आयपीएल (IPL 2021) फक्त 6 ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटात प्रवासावर निर्बंध आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आता दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीमने बीसीसीआय (BCCI) आणि सरकारकडे विशेष मागणी केली आहे. खेळाडूंना कोरोनाची लस (Corona Vaccine) देण्यात यावी अशी मागणी दिल्ली कॅपिटल्सने बीसीसीआय आणि सरकारला केली आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर 30 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे. बायो-बबलमध्ये संपूर्ण आयपीएल खेळवली जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ विनोद बिष्ट म्हणाले, 'लस आमच्या डोक्यात आहे. खेळाडूंना एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागेल, त्यामुळे आम्ही बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे. बोर्ड याबाबत सरकारला विनंती करू शकते, पण याबाबत मला काहीही माहिती नाही. सरकार याला प्राथमिकता देईल, अशी आमची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक खेळाडूंना आधीच यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे सरकार आम्हालाही मदत करेल.'
आयपीएलचे खेळाडूच नाही, तर कर्मचारी ब्रॉडकास्टिंग टीमसह सगळ्यांनाच लस दिली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही बिष्ट यांनी दिली. तसंच कठीण काळामध्ये स्पर्धेच आयोजन करण्याबद्दल त्यांनी बीसीसीआयचे आभार मानले.
मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली होती, पण सगळ्या टीम एकाच ठिकाणी थांबल्या होत्या. भारतामध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. यावेळी कोणतीच टीम त्यांच्या घरच्या मैदानात खेळणार नाही, त्यामुळे हा मोसम सर्वाधिक आव्हानात्मक असेल, असं बिष्ट यांना वाटतं. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातल्या सामन्यातून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरूवात होईल. मागच्या वर्षी फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव करत सर्वाधिक पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Cricket news, Delhi capitals, IPL 2021