IPL 2021 : दिल्लीच्या पहिल्याच पराभवानंतर कोच पॉण्टिंगचा ऋषभ पंतच्या कॅप्टन्सीवर निशाणा

IPL 2021 : दिल्लीच्या पहिल्याच पराभवानंतर कोच पॉण्टिंगचा ऋषभ पंतच्या कॅप्टन्सीवर निशाणा

आयपीएलमध्ये (IPL 2021) गुरुवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा पराभव केला. या पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेत माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टन्सीवरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL 2021) गुरुवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा पराभव केला. या पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेत माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टन्सीवरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आर.अश्विन (R. Ashwin) याला त्याचा स्पेल पूर्ण करायला द्यायला हवा होता, त्याला 4 ओव्हर बॉलिंग दिली नाही, ही चूक झाल्याचं पॉण्टिंगनी कबूल केलं. या सामन्यात दिल्लीने राजस्थानला 148 रनचं लक्ष्य दिलं होतं. या सामन्याबद्दल बोलताना पॉण्टिंग म्हणाला, ‘13 व्या ओव्हरवेळी डेव्हिड मिलर (David Miller) 62 रनवर तर राहुल तेवतिया (Rahul Tevatia) 19 रनवर खेळत होता. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसला (Marcus Stoinis) ओव्हर दिली. स्टॉयनिसनी राजस्थानला 3 फोरसह 15 रन दिल्या होत्या त्यामुळे त्यांचा स्कोर 5 बाद 58 रन्सवरून 5 बाद 73 रन्सवर पोहोचला होता. त्याऐवजी भारताचा अनुभवी स्पिनर अश्विनचीच बॉलिंग सुरू ठेवली असती तर चाललं असतं, कारण अश्विनने 3 ओव्हरमध्ये एकही बाउंड्री न देता फक्त 14 रन दिल्या होत्या,’ असं पॉण्टिंग म्हणाला.

‘पहिल्या सामन्यात अश्विननी निराशा केली होती पण त्यानंतर त्याने प्रचंड कष्ट करून तयारी केली होती. त्याने राजस्थानविरुद्ध उत्तम बॉलिंग केली. कदाचित आमच्याकडूनच त्याला ओव्हर न देऊन चूक झाली ज्याबद्दल आम्ही आता बोलतो आहोत,' अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली.

राजस्थानला 5 ओव्हरमध्ये 58 रनची गरज होती. मॉरिसने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 4 सिक्स मारले. त्याने 18 बॉलमध्ये 36 रन केल्या आणि राजस्थानला दोन बॉल राखत विजय मिळवून दिला. याबद्दल पाँण्टिंग म्हणाला ,‘आम्ही मॉरिसला (Chris Morris) खूपच सोपे बॉल टाकले. आम्ही जर योग्य यॉर्कर टाकले असते तर मॉरिसला फटका मारताच आला नसता. हे बॉल जर बॅक ऑफ लेंग्थ किंवा स्टंपच्या उंचीच्यावर उसळणारे असते आणि विशेषत: ते पेसरनी टाकलेले बॉल असते तर त्याला बॉल फटकवणं खूप अवघड झालं असतं, हे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसतंय. मॉरिसला कशी बॉलिंग करायची याच्याबद्दल आम्ही आधी चर्चा केली होती, पण त्याची मैदानात अंमलबजावणीच झाली नाही.’

मैदानातील दवामुळे पेसरना बॉलवर पकड नीट धरता येत नव्हती त्यामुळे शेवटी त्यांच्या हातांतून बॉल सुटल्यामुळे शेवटच्या काही ओव्हरमध्ये फुलटॉस बॉल टाकले गेले. पण दुसऱ्या डावात दवाचा त्रास होणार हे आम्हाला माहिती हवं आणि आम्ही त्या दृष्टिनीच तयारी करायला हवी. ते आम्ही करू शकलो नाही, असं म्हणत पॉण्टिंगने नाराजी व्यक्त केली.

सामन्यातील शेवटच्या 4 ओव्हरमध्ये झालेल्या चुकांबद्दल बोलताना पॉण्टिंग म्हणाला,‘ 13व्या ओव्हरपर्यंत आम्ही योजनेनुसार खेळलो पण शेवटच्या 4,5 ओव्हरमध्ये मात्र आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे आम्ही सामना गमावला.’ आवेश खानच्या बॉलिंगमुळे पॉण्टिंग प्रभावित झाला. त्याने वजन कमी केलंय, तो फास्ट बॉलिंग करतो, त्याची बॉलिंग ऍक्शनही सुधारली आहे. त्याच्या बॉलिंगची लाइनलेंग्थ आणि व्हेरिएशन्स खरोखरच जबरदस्त होती,’ असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं.  24 वर्षांच्या आवेश खानने आतापर्यंत दोन मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.

ईशांत शर्माला दुखापत

दिल्लीचा फास्ट बॉलर ईशांत शर्मा टाचेच्या दुखापतीमुळे या वर्षीच्या आयपीएलमधील दोन्ही सामन्यांत खेळू शकला नाही. त्याची कमतरता आम्हाला जाणवलीच. पण त्याच्या जागी तरूण आवेश खानला संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. ईशांतची दुखापत लवकर बरी होऊन तो टीममध्ये परतावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तोपर्यंत आमच्या टीममध्ये क्रिस वोक्स, कागिसो रबाडा, टॉम करणसारखे बॉलर आहेतच, असंही पॉण्टिंगने स्पष्ट केलं. आता दिल्ली कॅपिटल्स रविवारी (18 एप्रिल) मुंबईत पंजाब किंग्सविरुद्ध सामना खेळेल.

First published: April 17, 2021, 8:40 AM IST

ताज्या बातम्या