मुंबई, 10 एप्रिल : यंदाच्या आयपीएलची (IPL 2021) आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचा दिल्ली कॅपिटल्सने (CSK vs Delhi Capitals) 7 विकेटने पराभव केला आहे. चेन्नईने ठेवलेलं 189 रनचं आव्हान दिल्लीने 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. दिल्लीचे ओपनर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी 13.3 ओव्हरमध्येच 138 रनची पार्टनरशीप केली. शिखर धवन 54 बॉलमध्ये 85 रन करून तर पृथ्वी शॉ 38 बॉलमध्ये 72 रन करून आऊट झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 रनवर नाबाद राहिला, तर मार्कस स्टॉयनिस 14 रनवर बाद झाला. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने 2 तर ड्वॅन ब्राव्होने 1 विकेट गेतली.
या सामन्यामध्ये चेन्नईने बॅटिंग जमणाऱ्या सगळ्या 11 खेळाडूंना संधी दिली होती. आठव्या क्रमांकावर सॅम करन बॅटिंगला आला तर नवव्या क्रमांकावर ड्वॅन ब्राव्हो, दहाव्या क्रमांकावर शार्दूल ठाकूर आणि अकराव्या क्रमांकावर दीपक चहर होते, पण त्यांना बॅटिंगची संधी मिळाली नाही. या मॅचसाठी बॅटिंग मजबूत केलेल्या चेन्नईचे बॉलर मात्र अपयशी ठरले.
दोन वर्षानंतर आयपीएल (IPL 2021) खेळणाऱ्या सुरेश रैनाने (Suresh Raina) धमाकेदार पुनरागमन केलं. रैनाच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईने (CSK vs Delhi Capitals) दिल्लीला विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं होतं. सुरेश रैनाने 36 बॉलमध्ये 54 रन केले. रैनाच्या या खेळीमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. रैनाशिवाय मोईन अलीने 36 रन, अंबाती रायुडूने 23 रन, रविंद्र जडेजाने 26 रन आणि सॅम करनने 34 रन केले. दिल्लीकडून क्रीस वोक्सने 2, आवेश खानने 2, आर.अश्विन आणि टॉम करनने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. चेन्नईने त्यांच्या 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 188 रन केले.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या दोन्ही टीमची या मोसमातली ही पहिलीच मॅच होती. चेन्नईने त्यांच्या टीममध्ये फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सॅम करन, ड्वॅन ब्राव्हो या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तर दिल्लीच्या टीममध्ये मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर, क्रिस वोक्स आणि टॉम करन हे परदेशी खेळाडू आहेत. कर्णधार म्हणून ऋषभ पंत याचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाल्यामुळे पंतकडे दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्लीची टीम फायनलपर्यंत पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात त्यांचा मुंबईकडून पराभव झाला होता, तर चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफही गाठता आली नव्हती. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर राहिली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. ही निराशाजनक कामगिरी सुधारायचं आव्हान धोनीच्या टीमपुढे असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, MS Dhoni, Rishabh pant