• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मालदीवच्या बारमध्ये नेमकं काय झालं? वॉर्नर-स्लेटरने केला खुलासा

मालदीवच्या बारमध्ये नेमकं काय झालं? वॉर्नर-स्लेटरने केला खुलासा

आयपीएल 2021 (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर बहुतेक देशांचे खेळाडू त्यांच्या घरी परतले आहेत, पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि कॉमेंटेटर अजून मालदीवमध्येच (Maldives) आहेत. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मायकल स्लेटर (Michael Slater) यांच्यात मालदीवच्या रिसॉर्टमध्ये असलेल्या बारमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर बहुतेक देशांचे खेळाडू त्यांच्या घरी परतले आहेत, पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि कॉमेंटेटर अजून मालदीवमध्येच (Maldives) आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या नागरिकांवर ऑस्ट्रेलियात यायला बंदी घातली आहे. भारतातल्या वाढलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमध्ये असतानाच डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मायकल स्लेटर (Michael Slater) यांच्यात मालदीवच्या रिसॉर्टमध्ये असलेल्या बारमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. या वृत्तानंतर आता वॉर्नर आणि स्लेटर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संडे टेलिग्राफने मालदीवच्या ताज कोरल रिसॉर्टमध्ये वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात बारमध्ये भांडण झाल्यांच वृत्त दिलं होतं. हॉटेलच्या बारमध्ये या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं, असा दावा या वृत्तात करण्यात आला. स्लेटरने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'मी आणि वॉर्नर दोघंही जुने मित्र आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही,' असं स्लेटर म्हणाला. स्लेटरने वरिष्ठ पत्रकार फिल रॉथफील्ड यांना मेसेज करून हे वृत्त चुकीचं आहे, असं सांगितलं. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरनेही या वृत्ताचं खंडन केलं आहे. 'आमच्यामध्ये कोणताही वाद झाला नाही. तुम्ही स्वत: तिकडे उपस्थित नसतानाही एवढं लिहिता. तुम्ही काहीही पाहिलं नाही. तुमच्याकडे याचा काहीही पुरावा नाही, मग तुम्ही काहीही लिहू शकत नाही,' असं वॉर्नर म्हणाला. वॉर्नर आणि स्लेटर यांची मैत्री जुनी आहे, या दोघांनी स्काय स्पोर्ट्स रेडियो आणि चॅनल 9 साठी अनेक कार्यक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियात यायला बंदी घातल्यामुळे मायकल स्लेटर याने त्यांचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. 'पंतप्रधानांना त्यांच्या देशाच्या नागरिकांची चिंता नाही, तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत,' असं स्लेटर म्हणाला होता. मॉरिसन यांनी मात्र स्लेटरचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं. देशाच्या नागरिकांचं संरक्षण आपली प्राथमिकता असल्याचं मॉरिसन म्हणाले होते. ऑस्ट्रेलियामध्ये 15 मे पर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कॉमेंटेटर्स असे एकूण 38 लोकं चार्टर विमानाने गुरुवारी मालदीवमध्ये पोहोचले. मालदीवमध्ये त्यांना दोन आठवड्यांपर्यंत राहावं लागणार आहे. 15 मेनंतर ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱ्यांना प्रवेश देण्यात आला तर त्यांना घरी जाता येईल. मायकल स्लेटर आयपीएल स्थगित व्हायच्या आधीच मालदीवला पोहोचला होता.
  Published by:Shreyas
  First published: