मुंबई, 20 एप्रिल : आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणारा फास्ट बॉलर चेतन सकारियाने (Chetan Sakaria) आपल्या खेळाने अनेकांना प्रभावित केलं आहे. सोमवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या (CSK) सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या, यात एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश होता. सकारियाच्या टीमचा या सामन्यात जरी 45 रनने पराभव झाला असला, तरी त्याने मात्र आपली छाप पाडली. सकारियाने 4 ओव्हरमध्ये 36 रन देऊन तीन विकेट घेतल्या.
मॅच संपल्यानंतर चेतनने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला. 'लहानपणापासूनच मला तू आवडतोस, आज तुझ्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी आयुष्यातला हा खूप सूंदर क्षण आहे. हा क्षण कायम माझ्या लक्षात राहिल. तुझ्यासारखं दुसरं कोणीही नाही आणि होऊही शकत नाही. माझ्यासारख्या खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद,' अशी भावुक पोस्ट सकारियाने केली आहे.
View this post on Instagram
चेतन सकारियाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6 विकेट घेतल्या आहेत. चेन्नईविरुद्ध 3 विकेट घेण्याआधी त्याने पंजाबविरुद्धही तेवढ्याच विकेट घेतल्या होत्या. पंजाबविरुद्ध सकारियाला मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि झाय रिचर्डसनची विकेट मिळाली होती, पण त्या सामन्यातही राजस्थानचा पराभव झाला होता.
चेतन सकारियाचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील टेम्पो ड्रायव्हर होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला. यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. दोन वर्ष बूक स्टॉलवर नोकरी करून सकारियाने कुटुंबाची मदत केली. जानेवारी महिन्यामध्ये त्याच्या भावाने आत्महत्या केली होती, त्यावेळी सकारिया सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत होता. खेळावरचं लक्ष विचलित होऊ नये, म्हणून कुटुंबाने चेतनला या घटनेबाबत माहिती दिली नाही. जेव्हा चेतन घरी आला तेव्हा त्याला याबाबत कळलं.
IPL 2021 : क्रिकेटसाठी बूक स्टॉलवर नोकरी, लिलावात झाला कोट्यधीश, आता आयपीएलमध्ये पदार्पण
चेतन सकारियाला राजस्थानने 1.2 कोटी रुपयांना विकत घेतलं, त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये होती. स्थानिक क्रिकेटमधल्या चांगल्या कामगिरीमुळे अनेक टीमची त्याच्यावर नजर होती. बँगलोर आणि राजस्थान यांच्यामध्ये चेतन सकारियावरुन लिलावात स्पर्धा रंगली. या मोसमात सकारिया राजस्थानकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे, त्याने 16.66 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Rajasthan Royals