Home /News /sport /

IPL 2021 : रैनाचा स्फोटक कमबॅक, अर्धशतकानंतर CSKच्या ड्रेसिंग रूमकडे पाहून इशारा

IPL 2021 : रैनाचा स्फोटक कमबॅक, अर्धशतकानंतर CSKच्या ड्रेसिंग रूमकडे पाहून इशारा

तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये (IPL 2021) पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या पहिल्याच सामन्यात धमाका केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळताना दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये रैनाने 32 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 एप्रिल : तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये (IPL 2021) पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या पहिल्याच सामन्यात धमाका केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळताना दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये रैनाने 32 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. 54 रनची खेळी करून रैना रन आऊट झाला. त्याच्या 36 बॉलच्या या खेळीमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. सुरेश रैना जेव्हा मैदानात आला तेव्हा चेन्नईने 13 बॉलमध्ये फक्त 7 रनच्या मोबदल्यात 2 विकेट गमावल्या होत्या. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डुप्लेसिस (Faf Du plesis) आऊट झाल्यानंतर रैना खेळपट्टीवर टिकून राहिला. सेट झाल्यानंतर त्याने दिल्लीच्या (Delhi Capitals) बॉलिंगवर आक्रमण केलं. वोक्सच्या बॉलिंगवर स्क्वेअर कट मारून रैनाने या मोसमातली त्याची पहिली फोर मारली. यानंतर त्याने दिल्लीच्या स्पिनरसमोरही फटकेबाजी केली. मॅचची पाचवी ओव्हर टाकायला आलेल्या अश्विनच्या बॉलिंगवर रैनाने लागोपाठ दोन फोर मारून आपले इरादे स्पष्ट केलं. सुरूवातीला रैनाने मोईन अलीला स्ट्राईक दिला, पण नंतर मात्र त्याने स्वत:च्या हातात सगळी सूत्र घेतली. रैना आणि मोईन अली यांच्यात 53 रनची पार्टनरशीप झाली. मोईन अलीची विकेट गेल्यानंतर रैनाने अश्विनच्या बॉलिंगवर पहिली सिक्स मारली. यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये अमित मिश्राच्या बॉलिंगवर त्याने दोन सिक्स तर 13 व्या ओव्हरमध्ये स्टॉयनिसच्या बॉलिंगवर एक सिक्स ठोकला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर सुरेश रैनाने जल्लोषामध्ये चेन्नईच्या डग आऊटमध्ये पाहून इशारा केला. अजूनही माझ्या बॅटमध्ये दम आहे आणि मी इकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठीच आलो आहे, जणू असंच रैनाला म्हणायचं होतं. रैनाने अंबाती रायुडूसोबतही 33 बॉलमध्ये 63 रनची पार्टनरशीप केली. सुरेश रैना आयपीएल 2021 मध्ये अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला. आयपीएल करियरमधलं त्याचं हे 39वं अर्धशतक होतं. याचसोबत त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बरोबरी केली आहे. तर शिखर धवन 42 अर्धशतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या टीमला मागच्या मोसमात सुरेश रैनाची कमतरता चांगलीच जाणवली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले-ऑफ गाठता आली नाही. पॉईंट्स टेबलमध्येही ते सातव्या क्रमांकावर राहिले. चेन्नईच्या टीमने आतापर्यंत धोनीच्या नेतृत्वात तीनवेळा आयपीएल जिंकली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या