Home /News /sport /

IPL 2021 : बायो-बबलमध्येही बुकींना असे मिळत होते प्रत्येक बॉलचे अपडेट, धक्कादायक माहिती समोर

IPL 2021 : बायो-बबलमध्येही बुकींना असे मिळत होते प्रत्येक बॉलचे अपडेट, धक्कादायक माहिती समोर

आयपीएलमध्ये (IPL 2021) बेटिंग करणाऱ्या दोन जणांना दिल्लीमध्ये अटक झाल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या स्टेडियमचा सफाई कर्मचारी बुकींना प्रत्येक बॉलचे अपडेट देत होता, असा संशय बीसीसीआयच्या (BCCI) भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख शब्बीर बुसेन शेखादम खांडवावाला यांनी व्यक्त केला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 5 मे : आयपीएलमध्ये (IPL 2021) बेटिंग करणाऱ्या दोन जणांना दिल्लीमध्ये अटक झाल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या स्टेडियमचा सफाई कर्मचारी बुकींना प्रत्येक बॉलचे अपडेट देत होता, असा संशय बीसीसीआयच्या (BCCI) भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख शब्बीर बुसेन शेखादम खांडवावाला यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत झालेल्या एका आयपीएल सामन्यात ही मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली. आयपीएलमध्ये सुरू असलेली मॅच आणि आपल्याला टीव्हीवर लाईव्ह प्रसारण होत असलेली मॅच यामध्ये काही सेकंदाचा फरक असतो, या फरकाचाच फायदा घेण्यासाठी बुकी क्लिनरकडून प्रत्येक बॉलचे अपडेट घेत होते. सफाई कर्मचाऱ्याशी फोनवर बोलून बुकींना पुढच्या बॉलला काय होणार हे टीव्हीवर लाईव्ह दिसण्याच्या आधीच कळत होतं, त्यामुळे ते सफाई कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार पुढच्या बॉलवर सट्टा लावत होते. अशाप्रकारे जी माहिती पुरवली जाते तिला पिच साईडिंग किंवा कोर्ट साइडिंग म्हणलं जातं. या माध्यमातून बुकींना बेटिंग करणं आणि यामध्ये जिंकणं सोपं जातं. 'माझ्या एका भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्याने एका व्यक्तीला पकडलं होतं, तसंच त्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली होती, ही व्यक्ती तिकडून पळून गेली, पण त्याचे दोन मोबाईल तिकडेच होते. याबद्दल भ्रष्टाचारविरोधी पथकाने तक्रार दाखल केली आहे,' असं हुसेन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. 'एसीयूने सांगितल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना अटक केली, याबद्दल त्यांचे धन्यवाद,' असंही हुसेन म्हणाले. दिल्ली पोलिसांनी खोटं अक्रेडेशन कार्ड बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. 2 मे रोजी राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातल्या सामन्यावेळची ही घटना आहे. दोन वेगवेगळ्या दिवशी त्यांना मैदानात प्रवेश मिळाला. यातला एक जण क्लीनरच्या वेशात आला होता. पण तो स्पर्धेचा कर्मचारी असल्यामुळे आमच्याकडे त्याचं आधारकार्ड आणि इतर सगळी माहिती आहे. ही माहिती आम्ही दिल्ली पोलिसांना दिली आहे, ते एक के दोन दिवसात त्याला पकडतील. ही व्यक्ती छोटा मासा आहे, काही शे किंवा हजार रुपयांसाठी तो काम करत होता, हुसेन यांनी सांगितलं. कोरोनामुळे खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत, तसंच त्यांना हॉटेलमध्येही प्रवेश नाही, त्यामुळे लहान कर्मचाऱ्यांचा वापर केला गेल्याची शक्यता हुसेन यांनी बोलून दाखवली. 'माझ्या एका अधिकाऱ्याने या व्यक्तीला फोनवर मैदानातून बोलताना पाहिलं. अधिकाऱ्याने त्याला हटकलं असता, त्याने मी गर्लफ्रेंडशी बोलतोय, असं सांगितलं. यानंतर अधिकाऱ्याने पुन्हा एकदा त्याच क्रमांकावर फोन करायला सांगितला. अधिकारी या व्यक्तीचा फोन पाहू लागला तेव्हा त्याने तिकडून पळ काढला,' अशी प्रतिक्रिया हुसेन यांनी दिली. 'आयपीएल स्पर्धेसाठी क्लास-4 कर्मचारी असणारे बस ड्रायव्हर, सफाई कर्मचारी यांना आयकार्ड देण्यात आली होती. दिल्लीतल्या संध्याकाळच्या मॅचमध्ये ही व्यक्ती आयकार्ड घालून आली होती, तसंच त्याच्या हातात दोन फोन होते, त्यामुळे आमचा संशय बळावला. हा कर्मचारी बूकींना माहिती पुरवत असेल, आम्हाला वाटत होतं, त्यामुळे आम्ही दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली,' असं हुसेन म्हणाले. आयपीएलमध्ये आम्हाला भ्रष्टाचार होत असल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. प्रेक्षक नसल्यामुळे आणि खेळाडू बायो-बबलमध्ये असल्यामुळे आम्हालाही गोष्टी हाताळणं सोपं गेलं, कारण खेळाडू कोणाच्याही संपर्कात नव्हते. अनेकवेळा मैदानात प्रेक्षक असले की एवढे जणांवर लक्ष ठेवणं आणि त्यांची तपासणी करणं कठीण असतं, असं हुसेन यांनी सांगितलं. मुंबईमध्ये सामने सुरू होते तेव्हा हॉटेलमध्ये तीन संशयास्पद माणसं होती, या माणसांची एसीयूच्या डेटाबेसमध्ये आधीपासूनच माहिती आहे, पण या तिघांचा खेळाडूंशी संपर्क आला नाही, तसंच आम्हाला समजल्यानंतर लगेच मुंबई पोलिसांना बोलावण्यात आलं, यानंतर पोलीस त्यांना घेऊन गेले, अशी माहिती हुसेन यांनी दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021

    पुढील बातम्या