मुंबई, 20 मार्च : बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमासाठी बायो सिक्युर प्रोटोकॉल तयार केला आहे, त्यामुळे खेळाडू एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये जाऊ शकतात. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भारत आणि इंग्लंडच्या (India vs England) खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे. भारत-इंग्लंड सीरिजमध्ये खेळाऱ्या खेळाडूंना थेट दुसऱ्या बबलमध्ये जाता येणार आहे, त्यांना क्वारंटाईनमध्ये राहाण्याची गरज नाही. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर स्पर्धेची फायनल 30 मे रोजी खेळवण्यात येईल. 6 ठिकाणी यावेळची आयपीएल खेळवली जाईल.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार भारत आणि इंग्लंडचे खेळाडू क्वारंटाईनमध्ये न राहता बबलमध्ये जाऊ शकतात, पण अन्य खेळाडू, टीम मालक, मॅनेजमेंटचे सदस्य, कॉमेंटेटर आणि मॅच अधिकारी यांना 7 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे.
'भारत-इंग्लंड सीरिजसाठी जो बायो-बबल बनवण्यात आला आहे, त्यात येणाऱ्या खेळाडूंना क्वारंटाईन व्हायची गरज नाही, पण त्यासाठी खेळाडूंना टीम हॉटेलमधून थेट टीम बस किंवा चार्टर्ड विमानाने यावं लागेल. इतर संबंधितांना मात्र 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. जर खेळाडू चार्डर्ड विमानाने येत असेल, तर सगळ्या सदस्यांना प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. प्रवासासंबंधीची व्यवस्था बोर्डाच्या चीफ मेडिकल अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे असेल तर खेळाडू थेट फ्रॅन्चायजीच्या बायो-बबलमध्ये जाऊ शकतो, त्याला क्वारंटाईन आणि आरटी पीसीआर टेस्टचीही गरज नाही,' असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
खेळाडूंचे 8 बायो-बबल
पाकिस्तानविरुद्धची सीरिज संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू (South Africa vs Pakistan) आयपीएल खेळण्यासाठी येतील, हे खेळाडू चार्टर्ड विमानाने आले तर त्यांना बायो-बबल टू बायो-बबल नियम लागू होईल आणि त्यांना क्वारंटाईनमध्ये जावं लागणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 12 बबल बनवण्यात आले आहे. यातले 8 बबल खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असतील. 2 बबल मॅच अधिकारी, मॅच मॅनेजमेंट टीमसाठी आणि 2 बबल ब्रॉडकास्ट कॉमेंटेटर, क्रूसाठी असतील. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंना थेट भेटता येणार नाही.
आयपीएल टीमच्या कोणत्याही मालकाला जर टीमसोबत राहायचं असेल, तर त्यांना 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह मिळाले, त्यामुळे स्पर्धा रद्द करावी लागली. आयपीएलवर ही नामुष्की ओढावू नये म्हणून बीसीसीआयने बायो-बबलबाबत कठोर निर्णय घेतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, India vs england, IPL 2021