मुंबई, 25 एप्रिल : बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांच्या दुखापतीनंतर राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) आणखी एक धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर एन्ड्रयू टाय (Andrew Tye) याने आयपीएलमधून (IPL 2021) माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणांमुळे एन्ड्रयू टाय ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. आयपीएलमधून बाहेर पडणारा टाय हा राजस्थानचा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर दुखापतींमुळे तर लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) बायो-बबलच्या त्रासामुळे आधीच आयपीएल सोडून गेला.
राजस्थान रॉयल्सने ट्वीट करून एन्ड्रयू टाय निघून गेल्याची माहिती दिली. 'एन्ड्रयू टाय वैयक्तिक कारणासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. जर त्याला काही सहकाऱ्याची गरज लागली, तर आम्ही त्याला मदत करू,' असं ट्वीट राजस्थान रॉयल्सने केलं. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकाराने केकेआरविरुद्धच्या विजयानंतर टाय ऑस्ट्रेलियाला परतत असल्याचं सांगितलं.
AJ Tye flew back to Australia earlier today due to personal reasons. We will continue to offer any support he may need.#RoyalsFamily
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 25, 2021
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात बेन स्टोक्सच्या हाताला फ्रॅक्चर झालं, त्यामुळे तो इंग्लंडला निघून गेला, तर लिव्हिंगस्टोनने एकही सामना न खेळता बायो-बबलचा त्रास होतो सांगून माघार घेतली. जोफ्रा आर्चर शस्त्रक्रियेनंतर खेळण्यासाठी परतणार होता, पण 7 दिवसांच्या बंधनकारक क्वारंटाईनमुळे त्याने न यायचा निर्णय घेतला.
34 वर्षांच्या ऍन्ड्रयू टायने ऑस्ट्रेलियासाठी 7 वनडे आणि 28 टी-20 खेळल्या. आयपीएलच्या या मोसमात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. टायने शेवटा सामना बिग बॅश लिगमध्ये पर्थ स्क्रॉचर्ससाठी सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळला होता.
टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर
राजस्थान रॉयल्सची टीम या आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. 5 सामन्यांमध्ये त्यांना दोनच सामने जिंकता आले आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही ते सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने चांगली बॅटिंग करुन टीमला विजय मिळवून दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Rajasthan Royals