दुबई, 26 ऑक्टोबर : IPL मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला स्पर्धेतील पहिल्या तीन संघांचा पराभव करावा लागणार आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला असा विश्वास आहे की यावर्षी त्याचा संघ हे सामने जिंकून दाखवेल. किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर वॉर्नरनं प्ले ऑफ गाठण्याची रणनीती सांगितली. शनिवारी झालेल्या सामन्यात 127 धावांचं अगदी छोटं लक्ष्यही सनरायझर्स संघाला पार करण्यात अपयश आलं.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत वॉर्नर म्हणाला, 'मला खात्री आहे की संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यात नक्कीच यशस्वी होईल. आमच्याकडे आता तीन आव्हानात्मक सामने आहेत. जर आम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर या तिन्ही संघांचा पराभव करावा लागेल आणि पुढच्या तीन सामन्यांसाठी आम्ही एकाच ध्येयाने पुढे जात आहोत.' सनरायझर्सचे 11 सामन्यांत केवळ 8 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध पुढचे तीन सामने होणार आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना फक्त हे तीन सामने जिंकायचेच नसून त्यातून त्यांना त्यांचा नेट रनरेट सुद्धा सुधरायचा आहे.
वाचा-हा तर पोलार्डचा भाऊ! आर्चरनं घेतला जबरदस्त कॅच, मैदानावरील सर्व खेळाडू शॉक
वॉर्नर म्हणाला, 'आमच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर ती अतिशय निराशाजनक होती. आम्ही आमची भूमिका नीट बजावू शकलो नाही. आम्ही मध्येच आत्मसंतुष्ट झालो. हा सामना आम्ही मागील सामन्याप्रमाणे घेतला नाही (राजस्थान रॉयल्सविरूद्ध जिंकला).' तो म्हणाला, "आमच्या फलंदाजांनी कदाचित असा विचार सुरू केला की आम्ही लक्ष्य सहजपणे साध्य करू आणि त्यामुळेच गोलंदाज आमच्यावर वर्चस्व गाजवण्यास यशस्वी झाले. क्रिकेटमध्ये जेव्हा आपण प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी संधी देतो तेव्हा ते त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा पूर्ण प्रयत्न करतात."
वाचा-'तुम्ही कायम Super Kings आहात', चेन्नईचा संघ बाहेर पडल्यानंतर साक्षी भावुक
वॉर्नरने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. पंजाबची फलंदाजीची सुरुवात चांगली करण्याची इच्छा होती पण गोलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही. हैदराबादला प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.