दुबई, 27 ऑक्टोबर : आयपीएलचा तेरावा हंगाम (IPL 2020) आता लीग स्टेजमध्ये पोहचला आहे. प्ले ऑफ गाठणारे संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. यात अव्वल स्थानी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ आहे. मात्र मुंबईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीबाब सस्पेन्स कायम आहे. दुखापतीमुळे बीसीसीआयनं रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळले. अशात रोहित आयपीएल खेळू शकणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे.
सोमवारी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात रोहित शर्माला वगळण्यात आले. बीसीसीआयच्या निवेदनात रोहित शर्माच्या दुखापतीकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. मात्र रोहित शर्माला काय झाले आहे, याबाबत काही माहिती दिली नाही. मुंबई इंडियन्सकडूनही रोहित शर्माच्या दुखापतीबाबत माहिती देण्यात आली नाही आहे.
मात्र मुंबई इंडियन्सनं 26 ऑक्टोबर रोजी रोहित शर्माचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडीओमध्ये रोहित सराव करताना दिसत आहे. दुखापतीनंतर पहिल्यांदाच रोहितचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
4️⃣5️⃣ seconds of RO 4️⃣5️⃣ in full flow!🔥#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/65ajVQcEKc
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
रोहित शर्माला काय झालं?
18 ऑक्टोबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. 23 ऑक्टोबर रोजी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंग झाल्याचे सांगण्यात आले. सध्या मुंबई इंडियन्सची जबाबदारी पोलार्डकडे आहे.
मुंबईचा संघ अव्वल
सध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी 11 सामन्यात 14 गुण मिळवले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ प्ले ऑफ नक्कीच गाठू शकतो. मात्र संघात रोहित शर्मा नसेल तर फलंदाजी कमकुवत होऊ शकते. सध्या रोहितच्या जागी सौरभ तिवारीला संधी देण्यात आली आहे.