मुंबई, 23 ऑगस्ट : महाराष्ट्रात एकवेळ बांधावरून सुरू असलेले गावोगावीचे वाद सुटतील, मात्र आयपीएल जवळ आल्यावर चेन्नई आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमधील खुन्नस काही संपणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पूर्ण ताकदीने भारतीय संघाचं समर्थन करणारी तरुण पोरं आयपीएल जवळ आल्यानंतर मात्र एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत असतात.
सोशल मीडियावर धोनी आणि रोहित शर्माचे चाहते एकमेकांना टोमणा मारत आपल्या आवडत्या संघाची पाठराखण करतात. मात्र सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध लिहिणाऱ्या या तरुणांमध्ये आता थेट हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आणि सगळीकडेच खळबळ उडाली.
रोहित शर्माचं पोस्टर फाडल्याचा आरोप करत कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये एका तरुणाला उसाच्या शेतात नेवून मारहाण करण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं होतं. मात्र ज्या चाहत्यांविषयी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यांनीच याबाबतचे वृत्त फेटाळलं आहे. 'आयपीएल वादामुळे मारहाणीची कोणतीही घटना घडली नाही. अशा प्रकारच्या बातमीमुळे तरुणांना नाहक त्रास झाला,' असा खुलासा संबंधितांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, रोहित आणि धोनीच्या चाहत्यांमध्ये राडा झाल्याचं हे वृत्त फेटाळण्यात आलं असलं तरीही व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरून या दोन्ही खेळाडूंचे चाहते आमने-सामने येतात, हे तर वास्तव आहे. या वादामुळे अनेक चांगल्या मित्रे दुरावतात.
प्रत्येक संघातील खेळाडू आपल्या प्रतिस्पर्धाचाही सन्मान करतात. त्यामुळेच क्रिकेटला Gentlemen’s Game म्हटलं जातं. या खेळाडूंकडून त्यांच्या चाहत्यांनीही काहीसा बोध घेतला तर क्रिकेटचा खरा आनंद लुटता येईल.