शारजा, 23 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कामगिरी आतापर्यंत त्यांच्या गौरवाला साजेशी झालेली नाही. या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी याच्या संघाला अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. प्ले ऑफमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मुंबईविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात पराभूत झाल्यास चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असून केवळ औपचारिकता म्हणून उर्वरित सामने खेळावे लागतील. त्यामुळे या सामन्यात धोनी आपल्या अनुभवी खेळाडूंवर भरोसा दाखवणार की नवीन तरुण खेळाडूंबरोबर जुन्या खेळाडूंना घेऊन विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध 19 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला होता. यांनतर त्याला संघातील युवा खेळाडूंविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या खेळाडूंमध्ये जोश आणि जिद्दीची कमी असल्याचे म्हटले होतं. त्याच्या या विधानावर भारताचे माजी खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासह अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे आज मुंबईविरूद्धच्या सामन्यात धोनी या तरुण खेळाडूंना संधी देतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ऋतुराज गायकवाड, एन. जगदीशन, आर. साई किशोर आणि के एम. आसिफ यांच्यासारख्या तरुण खेळाडू संघात असताना त्यांना आज संधी मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे.
वाचा-राजस्थानच्या पराभवानं उघडले धोनीचे दरवाजे, अशी गाठणार CSK प्ले ऑफ
गायकवाड तिसऱ्या संधीच्या शोधात
23 वर्षीय ऋतुराज गायकवाड टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो. या आयपीएल स्पर्धेत त्याला आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. परंतु या सामन्यांमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. ड्वेन ब्राव्हो संघात आल्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र केदार जाधवच्या खराब फॉर्ममुळे गायकवाडला संधी मिळू शकते. त्याचबरोबर सॅम करण याला वरच्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय संघासाठी फार काही उत्तम ठरलेला नाही. त्यामुळे गायकवाडला सलामीला खेळण्याची देखील संधी मिळू शकते. टी-20 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 28 सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
वाचा-12.50 कोटींना विकत घेतला 'हा' खेळाडू, 103 चेंडूनंतरही मारू शकला नाही एक सिक्स
जगदीशन उत्तम खेळ करून देखील संधी नाही
24 वर्षीय नारायण जगदीशन याला या मोसमात एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात त्याने उत्तम कामगिरी करत 28 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला पुढे देखील संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या सामन्यानंतर त्याला संघातून बाहेर बसवले गेले. बँगलोरविरुद्धच्या सामन्यात 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने नारायण जगदीशन याला संघाबाहेर करत पुढील सामन्यात पियुष चावला याला संधी दिली.
वाचा-IPL 2020 : कोंबडीच्या आवाजातलं आयपीएल थिम सॉन्ग बघितलंत का? VIRAL VIDEO
के एम आसिफला एकही संधी नाही
या युवा वेगवान गोलंदाजाला या मोसमात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. 140 च्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला या खेळाडूला आजच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात त्याला शार्दूल ठाकूरच्या जागी खेळवले जाऊ शकते. त्याचबरोबर हेजलवूडच्या जागी देखील त्याला संघात संधी मिळू शकते. त्यामुळे चेन्नईला इम्रान ताहीर याला देखील संघात खेळण्याची संधी मिळू शकते.
वाचा-IPL 2020 : ...म्हणून क्रिकेटपटू दोन टोप्या घालून मैदानात दिसत आहेत
साई किशोरलाही संधी नाही
23 वर्षीय साई किशोर हा डावखुरा स्पिनर आहे.पण संघात मोठ्या प्रमाणात स्पिनर असल्याने त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. पण त्याला पियुष चावल्याच्या जागी आजच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.